हसन मुश्रीफ
कोल्हापूर; महातंत्र वृत्तसेवा : कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील 1,100 खाटांच्या रुग्णालयाऐवजी 600 खाटांचे सामान्य रुग्णालय व 250 खाटांच्या कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थेतील विविध सुविधांच्या उपाययोजना करण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत मुश्रीफ बोलत होते.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील इमारतींना रंगकाम, रस्ते दुरुस्ती, खिडक्या दुरुस्ती, दरवाजे दुरुस्ती, ड्रेनेज दुरुस्ती इत्यादी कामे करण्यासाठी 48.45 कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देऊन ही कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील ऑडिटोरियम हॉलमधील नूतनीकरण करण्यासाठी 11 कोटी 50 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून, ऑडिटोरियम हॉलमध्ये आवश्यक कामे करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.
यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव डॉक्टर अश्विनी जोशी, शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.