नवी दिल्लीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
कासारसिरसी अपर तहसिल कार्यालय आणि तालुका निर्मितीच्या मुद्यावरून सुरू असलेला वाद आता मारपीठीवर आला आहे. अपर तहसिल कार्यालयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल होताच त्याचे पडसाद उमटले आहे. याचिकाकर्ते दयानंद मुळे यांना धक्काबुकी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे पोलिसात दाखल करण्यात आली.
Related News
तहसीलचा वाद गावागावात पेटला
निलंगा तालुक्यातील कासारसिरसी अपर तहसिल कार्यालयाचा वाद आता गावागावात पेटलेला पाहायला मिळत आहे. तहसिल कार्यालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली. याचा राग मनात धरुन दयानंद मुळे यांना धक्काबुकी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूने देखील तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.
चौघांनी मारहाण करून दिली धमकी
निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथील रहिवासी समर्थक प्रशांत बब्रूवान येळणूरे, विलास नागोराव रनखांब, माधव शंकर बनसोडे, दिंगबर बाबुराव मुळे या चार जणांनी मिळून याचिकाकर्ते दयानंद मुळे याना बुधवारी ‘तू कासारसिरसी येथील अप्पर तहसिल कार्यालयाच्या विरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका का? दाखल केली` असे म्हणत धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दयानंद मुळे यांनी पोलिसांत केली.
कासारसिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
यावरून प्रशांत बब्रूवान येळणूरे, विलास नागोराव रनखांब, माधव शंकर बनसोडे, दिंगबर बाबुराव मुळे या चार जणावर कासारसिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या संबंधित चौघांनी देखील मुळे यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी दोघांच्याही तक्रारीची दखल घेत परस्परविरोधी गुन्हे दाखल केले.
चौघांपासून जीवितेला धोका
धमकी देणारे चौघेही गुंड प्रवृत्तीचे लोक असून ते नेहमीच मला दमदाटी करतात. या लोकांपासून माझ्या जीवीताला धोका असून मी रात्री-अपरात्री कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जात असतो. माझ्या जीवीताला धोका झाल्यास हे चौघे जबाबदार असतील असे, दयानंद मुळे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
जशास तसे उत्तर देण्याचा इशारा
दरम्यान, निलंगेकर एकसंघ तालुका कृती समितीच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. लवकरच या सर्व प्रक्रियेला स्थगिती मिळणार आहे. माझे सहकारी एकोजी मुदगडचे नागरिक दयानंद मुळे यांना झालेली धक्काबुकी अजिबात खपवून घेणार नाही. यापुढे असा प्रकार केला तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा तालुका एकसंघ कृती समितीचे अध्यक्ष संभाजी तारे यांनी दिला आहे.