औरंगाबादएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
महापालिकाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून कॅच देम यंग अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना जिम्नॅस्टिकचे विनाशुल्क प्रशिक्षण दिले जात आहे. याचा शुभारंभ पालिका प्रशासक जी. श्रीकांत व जिम्नॅस्टिक असोसिएशनचे विकास देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.29) नारेगाव येथील पालिका शाळेत झाला.

जिम्नॅस्टिक खेळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू पालिकेतून घडावे, या उद्देशाने हे अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे. सर्वप्रथम या अभियानासाठी जिम्नॅस्टिक प्रशिक्षण तज्ज्ञाकडून नारेगाव पालिका शाळेची निवड करण्यात आली. त्यानुसार या शाळेतील मुलांना जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रकारात विशेष प्रगती साध्य करणार्या मुलांना विशेष प्रशिक्षण देखील पालिका प्रशासनातर्फे देण्यात येत आहे.
तसेच क्रमांक्रमाने सर्वच पालिका शाळांत हे अभियान राबवले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू स्वतः या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडून येईल. खेळाविषयी त्यांच्यात आवड निर्माण होईल. या माध्यमातून ते स्वत:बरोबरच शाळा, शिक्षक आदींचे नाव रोषण करतील,अशी अपेक्षा प्रशासक जी. श्रीकांत यांनी यावेळी व्यक्त केली.
मैदान विकसित करणार
नारेगाव शाळेत कबड्डी आणि बॅडमिंटनचे मैदान विकसित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी क्रीडा अधिकारी संजय बालय्या, मुख्याध्यापिका संगीता ताजवे यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या जिम्नॅस्टिक प्रशिक्षणात सहभाग नोंदवला.