स्वस्तात अन्नधान्य, इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन आणि लोकांची लूट… मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : 1100 रूपयांत 6 महिन्यांचं किराणा सामान, 3 हजारांत इलेक्ट्रिक दुचाकी आणि 1200 रूपये भरा, दरमहा 10 हजार घ्या.. थांबा  ही कोणती शासकीय योजना (Government Scheme) नाही तर मराठवाड्यातली मालामाल होण्याची स्कीम आहे. बसला ना धक्का तुम्हाला. असाच धक्का अनेकांना बसला आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकांनी या स्कीममध्ये पैसे गुंतवले. नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि जालन्यात यासाठी जवळपास 700 एजंट नेमण्यात आले. महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र, जनकल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अश्या नावांचा वापर करून लोकांना स्वस्तात धान्य (Cheap Grain), स्वस्तात शिलाई मशीन, अत्यंत माफक दरात इलेक्ट्रीक बाईक (Electric Bike) देण्याचं आमिष दाखवण्यात आलं.  लोकांचा विश्वास संपादित करण्यासाठी सुरूवातीला थोड्याफार प्रमाणात अन्नधान्यही देण्यात आलं. नंतर मात्र या स्वप्न दाखवणाऱ्या या टोळीनं शेकडो लोकांना हातोहात गंडवल्याचं उघड होताच अनेकांची पाचावर धारण बसली. 

या टोळीनं 100 कोटींपेक्षा जास्त लूट केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 13 आरोपींपैकी तीन जणांना अटक केलीय. राजकुमार सुतारे, भीमराव वाघमारे, नरेश इंगोले, संतोष गच्चे अशी मुख्य आरोपींची नावं आहेत.

कशी होती मोडस ऑपरेंडी?
हे लुटारू छ्त्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्था संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र नावानं योजना चालवायचे. त्याअंतर्गत त्यांनी 1100 रूपयांत गहू, तांदूळ, साखर, शेंगदाणा, पोहा असा 85 किलोंचा शिधा देण्याचं आमिष दाखवलं. अवघ्या 3 हजारात इलेक्ट्रिक बाईक मिळेल असंही सांगण्यात आलं. 2200 रूपयांत शिलाई मशीन, विधवा महिलांनी महिन्याकाठी 1200 रूपये भरल्यास वर्षभर 10 हजार रूपये आणि नंतर पेन्शन देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. 

Related News

गेल्या एक ते दीड वर्षांपासून लुटीचा हा गोरखधंदा सुरू होता. यात जास्तीत जास्त लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यात 700हून अधिक एजंट नेमण्यात आले. यावरून या लुटीची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना येईल.

कमी कालावधीत श्रीमंत होण्याचं अनेकजण स्वप्न पाहतात. नेमकी हीच गोष्ट त्यांच्या फसवणूकीसाटठी कारणीभूत ठरते. यातून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांचं फावतं. झटपट श्रीमंत, दामदुप्पट योजनांमध्ये आयुष्यभराची जमापूंजी लावून  सर्वसामान्य नागरिक देशोधडीला लागत आहेत. पण दुर्देव म्हणजे अशा अनेक स्किमचा पर्दाफाश होऊनही सर्वसामान्य नागरिक यातून धडा घेत नाही हीच खरी शोकांतिका आहे. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *