छत्रपती संभाजीनगर : पैशांच्या वादातून तरुणाचा खून | महातंत्र
छत्रपती संभाजीनगर; महातंत्र वृत्तसेवा : पैशाच्या वादातून एकाने भररस्त्यात गावठी कट्ट्याने गोळीबार करून तरुणाचा खून केला. चार राऊंड फायर केल्यावर एक गोळी छातीत लागली त्यामुळे तरुण जागीच कोसळला. दरम्यान, दुसरी गोळी एका रिक्षाचालकाच्या हाताला लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. इंदिरानगर, बायजीपुरा येथील हयात क्लिनिकजवळ बुधवारी (दि. ९) रात्री पावणेआठ वाजता ही घटना घडली. गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाला आहे.

अलखुतुब हबीब हमद ऊर्फ माया (वय ३०, रा. जोहरा मशिदीजवळ, बायजीपुरा) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर समीर बशीर पठाण हा रिक्षाचालक या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे, याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी दिली. गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाल असून  फैयाज पटेल (२७, रा. इंदिरानगर, न्यू बायजीपुरा) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, मृत हमदचे आरोपी फैयाजकडे साडेसात हजार रुपये होते. तो अनेक दिवसांपासून फैयाजला पैसे मागत होता. फैयाज प्रत्येकवेळी आज-उद्या करून टाळाटाळ करीत होता. पैशांवरून त्यांच्यात अनेकदा वादही झाला होता. दरम्यान, हमदने पैशांसाठी त्याच्याकडे बराच तगादा लावल्यामुळे फैयाजने त्याला गोळीने मारु जीवे मारण्याची धमकी दिली होती.

२० ऑगस्ट रोजी होते हमदचे लग्न

 अलखुतुब हबीब हमद हा पैठण गेट भागातील एका कपड्याच्या दुकानात काम करीत होता. त्याच्या वडिलांनी आईला तलाक दिलेला आहे. तो त्याच्या आईला एकुलता एक मुलगा होता. तो आईसोबतच राहायचा. येत्या २० ऑगस्ट रोजी त्याचे लग्न होणार होते, अशी माहिती या भागातील माजी नगरसेवक जफर यांनी दिली.

हेही वाचलंत का?

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *