गंगापूर; महातंत्र वृत्तसेवा : दुधाला योग्य दर मिळत नसल्याने पुणे महामार्गावरील नवीन कायगाव येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांनी एक तास रस्ता रोको आंदोलन केले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुग्धविकास मंत्री यांच्या फोटोवर दूध टाकून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दुधाचा निव्वळ उत्पादन खर्च शासकीय आकडेवारीनुसार ४२ रुपये असून सध्या मिळत असलेला भाव हा २५ ते २७ रुपये आहे. मुद्दलमध्ये १४ रूपये तोट्यात येऊन दुध उत्पादक व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे ४२ रुपये उत्पादन खर्च अधिक १५% नफा ग्राह्य धरून किमान ५० रु गाईच्या दुधाला भाव मिळावा या प्रमुख मागणीसह पशुखाद्यचे ५०% भाव कमी करण्यात यावे, गाईच्या भाकड काळात पशुखाद्यासाठी प्रति गाय 2 हजार रु अनुदान द्यावे, वैद्यकीय सेवेसाठी अद्यावत डॉक्टर,लॅब ची सुविधा देण्यात यावी, अशा मागण्या करून रस्ता रोको करण्यात आला. शासनाने येत्या चार दिवसात दखल घेऊन ५० रुपये भाव दिला नाही, तर दूध उत्पादक शेतकरी संपावर जाणार आहेत. आणि यानंतरचे तीव्र आंदोलन उभारणार असून याची गंभीर दखल शासनाने घ्यावी. असा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके, विनोद काळे, उद्धव काळे, संदीप उंबरकर, राजेंद्र इष्टके, संपत रोडगे, नंदकिशोर बागल आदींनी यावेळी दूध दराबाबत भूमिका मांडली. प्रशासनच्या वतीने महसूल चे मंडळ अधिकारी, संभाजीनगर जिल्हा निबंधक (दूध सहकारी संस्था) दूध संघाचे कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
हेही वाचा :