Chhatrapati Sambhajinagar News : बापाच्या गोळीबारात जखमी झालेल्या चिमुकल्याची मृत्यूची झुंज अपयशी | महातंत्र
गंगापूर, महातंत्र वृत्तसेवा : अखेर गंगापूर येथील अडीच वर्षाच्या चिमुकल्या आर्यनची ४८ तासांची झुंज अपयशी ठरली. शहरातील अहिल्यादेवी नगर येथे शुक्रवारी सायंकाळी घरात वडिलांनी केलेल्या गोळीबारात आर्यन जखमी झाला होता. छत्रपती संभाजीनगर येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. आज (दि. २७) सकाळी सातच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी वडील राहुल राठोड याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अहिल्यादेवीनगर येथे बीड येथील राहुल कल्याण राठोड (वय २९) पत्नी संगीता व अडीच वर्षांच्या मुलासह भाडेकरू म्हणून राहत होता. राहुल एका बँकेत कर्जवसुलीचे काम करत होता. शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी सहाच्या सुमारास घरात वडील राहुलने केलेल्या गोळीबारात मुलगा आर्यन राठोड गंभीर जखमी झाला होता. या घटनेत आर्यनच्या डोक्याच्या मधोमध गोळी लागली होती. त्याला खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री त्याच्यावर एक छोटासी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर अतिदक्षता विभागात आर्यनची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, त्याची ही झुंज अपयशी ठरली.

Chhatrapati Sambhajinagar News  : आईचा आक्रोश मन हेलावणारा

गोळीबार प्रकरणाला कारणीभूत असलेला आर्यनचा बाप राहुल याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. आर्यनजवळ आई व इतर कुटुंबीय होते. दरम्यान, रविवारी सकाळी आर्यनच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी देतातच आर्यनच्या आई संगीता राठोड यांनी घाटी रुग्णालयात टाहो फोडला. यावेळी नातेवाईकांसह उपस्थितांचे डोळे पाणावले होते. तर आई संगीताचा आक्रोश मन हेलावणारा होता.

बापावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

राहुलची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर परत न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ करण्यात आली. तर पोलिसांनी आरोपी राहुल याच्याविरोधात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक आवटी करीत आहेत.

हेही वाचा 

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *