Chhatrapati Sambhajinagar robbery: रांजणगावात सराफी दुकानावर दरोडा; सोन्या-चांदीचे दागिने लुटले | महातंत्र
वाळूज महानगर, महातंत्र वृत्तसेवा : तोंडाला काळ्या रंगाचा रुमाल बांधलेल्या तिघांनी एका ज्वलर्सच्या दुकानात घुसून दुकान मालकाला चाकूचा धाक दाखवित बेदम मारहाण करून लाखो रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले. ही घटना मंगळवारी (दि.८) दुपारी रांजणगाव येथे घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. (Chhatrapati Sambhajinagar robbery)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद उत्तमराव बेद्रे (वय ५१, रा. सिडको, वाळूज महानगर) यांचे रांजणगाव येथील मुख्य रस्त्यावर मंगलमूर्ती ज्वलर्स नावाने दुकान आहे. मंगळवारी सकाळी बेंद्रे यांनी दुकान उघडून त्यांनी ते ग्राहकांची प्रतीक्षा करत खुर्चीवर बसले होते. बारा वाजेच्या सुमारास अंगात फिकट काळसर रंगाचा शर्ट घातलेल्या भामट्याने बेद्रे यांच्या दुकानात शिरून त्याने बेद्रे यांना काही कळायच्या आत काउंटरवरून उडी मारत बेद्रे यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी बेद्रे हे त्यास प्रतिकार करत असताना भामट्याच्या आणखी दोन साथीदार एका पाठोपाठ दुकानात शिरले. (Chhatrapati Sambhajinagar robbery)

त्यातील एकाने दुकानाचे शटर आतून बंद करून घेत तिघांनी बेद्रे यांना चाकूचा धाक दाखवित बेदम मारहाण केली. या घटनेत बेद्रे यांच्या उजव्या हाताला चाकू लागून किरकोळ जखम झाली. दरम्यान, दोघा भामट्यांनी बेद्रे यांना पकडून ठेवले तर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने दुकानातील सर्व सोन्याचांदीचे दागिने एका बॅगमध्ये भरून भामटे कमळापूर फाट्याच्या दिशेने पसार झाले. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सचिन पागोटे आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेऊन चोरट्यांचा शोध सुरु केला. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

हेही वाचा 

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *