महातंत्र ऑनलाईन डेस्क : आम्ही मराठा समाजास न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार आहोत. समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले जाईल. त्यासाठी सर्व बाजूंनी विचार सुरु आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मराठा आंदोलक जरांगे-पाटील यांच्या आवाहानानंतर मराठा समाजाने सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी केली. मात्र, एकनाथ शिंदे मराठा आंदोलकांना चकवा देत कोल्हापुरच्या कणेरी मठातील कार्यक्रमास उपस्थित राहिले. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला यापूर्वी देण्यात आलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. आरक्षणाबाबत पुन्हा असे घडू नये, यासाठी सरकार काळजी घेत आहे. आम्हाला न्यायालयात टिकेल असे आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे आंदोलकांनीही सरकारची भूमिका समजून घेत सहकार्य करावे. मनोज जरांगे यांनी चर्चेची दारे खुली करावीत. आंदोलनावेळी शांततेचा मार्ग सोडू नये असे आवाहन शिंदे यांनी या वेळी केले.
राज्यात अनेक मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावात येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत गोपिनियता पाळण्यात आली होती. या दौऱ्याची माहिती राजकीय कार्यकर्त्यांनाही नव्हती. शिंदे यांच्या हस्ते कणेरी मठातील एका उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या या दौऱ्यावेळी मठाच्या परिसरात अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.
हेही वाचलंत का?