आई गेल्यावरच तिचे महत्व मुलांना समजते!: भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांची खंत; आदर्श माता पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

पुणे43 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

आई आपल्यासोबत आहे तोपर्यंत तिला जपा. समाजात वाढत चाललेल्या वृद्धाश्रमांची संख्या कमी व्हायला पाहिजे. आई-वडिलांनी देखील मुलांवर विश्वास ठेवायला हवा, त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही तर ते काहीच करू शकणार नाहीत. आई गेल्यावर तिचे महत्त्व आपल्याला कळते, परंतु तेव्हा उशीर झालेला असतो, अशी खंत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्च्या वतीने पाचवा आदर्श माता पुरस्कार प्रदान सोहळा नऱ्हे हे येथील जाधवर इन्स्टिटयूटच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक, आमदार रवींद्र धंगेकर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आमदार सत्यजित तांबे यांच्या मातोश्री दुर्गाबाई तांबे, आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मातोश्री रुक्मिणी धंगेकर आणि आयएएस अधिकारी डॉ.पूजा खेडकर यांच्या मातोश्री डॉ.मनोरमा खेडकर यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुणेरी पगडी, साडी असे पुरस्काराचे स्वरुप होते.

शौमिका महाडिक म्हणाल्या, समाजामध्ये वावरताना जेव्हा मोठी झालेली माणसे बघतो तेव्हा त्यांना घडविणा-या त्यांच्या माता असतात, हे विसरता कामा नये. राजकारणामध्ये प्रशासनामध्ये चांगल्या लोकांनी येणे गरजेचे आहे. बदलत्या काळाप्रमाणे आईची भूमिका देखील बदलली आहे. सगळ्याच गोष्टी आव्हानात्मक झाल्या आहेत. मुलांना चांगले बनविण्यासाठी आपण चांगले बनले पाहिजे.

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, समाजातील प्रत्येक माता ही आपलीच माता आहे, असे समजून आपण प्रत्येक स्त्रीला आदर द्यायला हवा. कोणत्याही स्त्रीवर अन्याय होणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी.

दुर्गाबाई तांबे म्हणाल्या, मुलांवर आपण संस्कार करतोच, पण मुले ही आई-वडिलांच्या कृतीतून, त्यांच्याकडे बघून घडत असतात. आईच्या भूमिकेतून प्रथमच आदर्श माता पुरस्कार मिळाला याचा आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले. अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *