लवंगी मिरची : स्वच्छ हवा अन् आयुर्मान | महातंत्र
सिंगापूर या देशामध्ये लोकांचे आयुष्यमान वाढले आहे म्हणे. तेथील लोकांच्या आयुष्यमानात सरासरी वीस वर्षांनी वाढ झाली आहे.याचा अर्थ एवढाच आहे की काही दिवसांनी शतक पूर्ण केलेले म्हणजे वयाची शंभरी पूर्ण केलेले असंख्य नागरिक सिंगापूरमध्ये दिसायला लागतील. याची कारणे शोधली असता असे लक्षात आले की दोन गोष्टी आयुष्यमान वाढवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे स्वच्छ हवा आणि दुसरी म्हणजे घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंतचे अंतर. सिंगापुरात मेट्रोची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला फारसे चालावे लागत नाही. अर्धा-पाऊण किलोमीटर चाललात की लगेच तुम्हाला मेट्रो स्टेशन लागते आणि तुम्ही मेट्रोमध्ये बसून कार्यालयात किंवा गुंतवणूकस्थळी पोहोचू शकता.

दुसरी गोष्ट म्हणजे हवा. तेथील हवा कमी प्रदूषणाची आणि शुद्ध अशी असल्यामुळे लोकांना श्वसनाचे विकार होत नाहीत, त्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढले आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण आपला विचार केला तर सध्या मुंबईची हवा ही प्रदूषित आणि श्वास घेण्यास अयोग्य अशी आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तीच परिस्थिती सध्या पुण्यामध्ये आहे.

आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पाहिली तर सगळ्यात पहिल्यांदा लोकल असो की मेट्रो, त्या स्टेशनपर्यंत पोहोचणे अत्यंत अवघड असते. स्टेशनच्या जवळ जाणारे रस्ते नेमके चिंचोळे होत जातात आणि त्या रस्त्यांवरती असंख्य फेरीवाले सकाळपासून ठाण मांडून असतात. त्या एकाच अरुंद रस्त्यावरून जाणारे आणि येणारे आपल्या पाऊल खुणा उमटवीत असतात. अशावेळी धक्काबुक्की, गर्दी, गोंधळ याचा सामना करावा लागतो. साहजिकच श्वसनजन्य रोगही या ठिकाणी पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मुंबईकर या रोजच्या त्रासाला कंटाळलेले असतात.

हीच परिस्थिती पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये अद्याप मेट्रोचे जाळे सर्वत्र पसरलेले नसले तरी लोक बर्‍यापैकी सिटी बसेसवर अवलंबून आहेत. दिवसातील कोणत्याही वेळी सिटी बस स्टॉपवर पाहिले तर किमान शंभर-दोनशे लोक बसची वाट पाहताना दिसतात. नागरिकांनी तिथवर कसेबसे पोहोचणे, त्यानंतर आधीच खचाखच भरलेल्या बसमध्ये इतर लोकांच्या बरोबर धक्काबुक्की करून आतमध्ये प्रवेश मिळवणे जिकिरीचे असते. आपले उतरण्याचे स्थान येईपर्यंत बसायला मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे हातातील बॅग सांभाळून, उभे राहून प्रवास करणे, हे सर्व करताना होणारी दगदग ही आयुष्यमानावर परिणाम करणारी नक्कीच असेल.

या अशा कारणांमुळे भारतातील लोकांचे शतक तर सोडा; परंतु अमृत महोत्सव साजरा झाला तरी खूप झाले, अशी आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था झालेली आहे. कदाचित त्यामुळे शासनाने शासकीय कर्मचार्‍यांसाठी 58 वर्षांचे वय हे सेवानिवृत्तीचे वय ठरवले आहे. यामधील शासनाचा उदारमतवादी द़ृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. 58 वर्ष वयाच्या व्यक्तीला घरी बसवले म्हणजे तेवढीच त्याच्यामुळे होणारी गर्दी कमी होते आणि त्याचा स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ असा साधला जातो की, त्याला या उतारवयात दगदग करण्याची गरज पडत नाही. तसे तर काम करून दिले तर लोक 65 आणि 70 पर्यंत काम करतील; परंतु जनतेचा विचार करूनच आणि त्यांचे आयुष्यमान कसे वाढेल याचा विचार करूनच शासनाने सेवानिवृत्तीचे वय अलीकडे ओढले आहे. शेवटी काय आहे तर जास्तीत जास्त दीर्घकाळपर्यंत जगणे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *