लवंगी मिरची : मेंदूचा वापर | महातंत्र

अमेरिकेतील एका शास्त्रज्ञाने असे विधान केले आहे की, माणूस हा आपल्या मेंदूच्या फक्त दहा टक्के भागाचा वापर करतो. मी काय म्हणतो मित्रा, हे अमेरिकेतील लोकांबद्दल कदाचित खरे असेल; पण आपल्या भारतीय आणि विशेषत: मराठी माणसांबद्दल काय परिस्थिती असणार आहे?

त्यापेक्षा मला असे वाटते की, फक्त दहा टक्के भाग वापरून आपले लोक एवढा मोठा सत्यानाश करत असतील, तर मेंदूचा जास्त वापर सुरू झाला, तर काय परिस्थिती होईल? म्हणजे बघ, वाटेल तिथे कचरा फेकतील, तंबाखू खाऊन पचापचा थुंकतील, सिगरेटचे झुरके ओढून आजूबाजूच्या लोकांना त्रास देतील, किरकोळ कारणावरून अरे ला कारे करून मारामार्‍या करतील, सर्रास राँग साईडने गाड्या दामटतील, असे अनेक लोक आपला सभोवताल बिघडवत असतात. या लोकांनी 10 टक्क्यांच्या ऐवजी मेंदूचा वापर जास्त करायला सुरुवात केली, तर फारच भयानक परिस्थिती उद्भवेल असे वाटते. हे बघ, जेवढे लोक बुद्धीचा वापर कमी करतील तेवढे राजकारणी लोकांना फायद्याचे असणार आहे. कमी बुद्धी वापरणारा मतदार पाहिजे तसा वळवणे सोपे असणार आहे. समजा, मतदारांनी जास्त बुद्धिमत्ता वापरली, तर तो सारासार विचार करेल आणि मगच मतदान करील.

मग, राजकारणी लोकांची पंचायत होऊन बसेल. हे बघ मित्रा, मेंदूचा कितीही वापर केला, तरी तो नेमका तुम्ही कसा करता, यावर सगळं अवलंबून आहे. एखाद्या गुन्हेगाराने मेंदू जास्त वापरला, तर तो सराईतपणे गुन्हे करू शकेल. एखाद्या चांगल्या माणसाने आपला मेंदू जास्त वापरला, तर तो चांगली कामे जास्त करू शकेल; पण तू काहीही म्हण, मला भारतीय माणसांच्या बुद्धिमत्तेबद्दल अजिबात शंका नाही. बुद्ध्यांकामध्ये भारत आणि विशेषतः आपला महाराष्ट्र जपानलासुद्धा मागे टाकू शकेल, अशी स्थिती आहे. साधे उदाहरण घे. फारसे न शिकलेला भाजीवाला किंवा भाजीवालीसमोर लसूण, आले, कोथिंबीर, मिरचीपासून ते कांदे बटाटेपर्यंत किमान वीस-पंचवीस प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी ठेवलेल्या असतात.

या भाज्यांचे रोजचे भाव बदलत असतात, तरीही तुम्ही सगळ्या भाज्या घेतल्या आणि त्याच्या पुढ्यात उभे राहिलात आणि तो हिशेब करायला लागला की, बरोबर न चुकता प्रत्येक भाजीचा त्या दिवशीचा भाव आणि तुम्ही घेतलेल्या भाजीचे वजन याचे गणित बरोबर मांडून शेवटी तुम्हाला फायनल बिल देतो. साधी गोष्ट नाही ही! त्यात पुन्हा ग्रामीण भागातील लोकसुद्धा टेक्नोस्याव्ही झाल्यामुळे सर्रास कॅल्क्युलेटरचा वापर करतात. त्यांच्यासमोरचे जुने वजनाचे काटे जाऊन त्याची जागा डिजिटल वजन काट्यांनी घेतली आहे. या डिजिटल वजनकाट्यांमुळे काटा मारणे या प्रकाराला फाटा मारला गेला आहे. झुकते माप देण्याची गरजच राहिलेली नाही. शिवाय तुमच्याकडून रक्कम घेण्यासाठी समोर स्कॅन ठेवलेले असते.

डिजिटल तंत्रज्ञान वापरून तो कॅशलेस पद्धतीने पैसे स्वीकारतो. असे तंत्रज्ञान वापरण्याची गरज ओळखून त्याप्रमाणे बदलणारा मराठी माणूस माझ्या मते मेंदूचा जास्त वापर करतो. आठ ते दहा भाज्या घेऊन निघालेल्या संगणक अभियंत्याला जो हिशेब लावायला पंधरा मिनिटे लागतात तो हिशेब फारसा न शिकलेला आमचा भाजीवाला किंवा भाजीवाली अवघ्या पाच मिनिटांत लावून दाखवतात. जगभरात माणसे आपल्या मेंदूचा दहा टक्के भाग वापरतात यावर माझा विश्वास नाही. आपल्या देशातील आणि विशेषत: महाराष्ट्र राज्यातील लोक आपल्या मेंदूचा पूर्णपणे वापर करतात, हे नक्की सिद्ध होईल, याविषयी शंका नाही.

– झटका

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *