सरकारला वेळ कशासाठी, ते समोर येऊन सांगा; मनोज जरांगे यांचा सवाल! | महातंत्र
वडीगोद्री; महातंत्र वृत्तसेवा : सरकारला वेळ कशासाठी हवा आहे, ते समोर येऊन सांगा. आरक्षण कसे द्यायचे, कधी देणार ते आम्हाला कळू द्या. त्यावर समाजाशी बोलून आम्ही वेळ द्यायचा की नाही ते ठरवू; पण वेळ मारून नेऊ नका. तुम्हाला गरज असेल तर चर्चेला या, नसेल तर तिकडेच विमानात झोपा, अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सरकारला सुनावले. सरकारकडून प्रतिसाद न
मिळाल्याने त्यांनी पाणीही घेणार नसल्याचा निर्णय बुधवारी संध्याकाळी जाहीर केला.

मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली बैठक संपल्यानंतर जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, इंटरनेट बंद केले, यामागे षड्यंत्र असू शकते. असले प्रकार बंद करा, इंटरनेट सुरू करा. इंटरनेट बंद केले तरी मराठे मागे हटणार नाहीत. सरकारने कितीही वातावरण खराब केले, तरी आम्ही शांततेत आंदोलन करत राहू. उद्रेकाला आमचे समर्थन नाही. हिंसक आंदोलन करू नका. बीडमध्ये पोलिसांनी शांततेत बसलेल्या लोकांना उचलू नये. बळाचा वापर करू नका, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.

आजच्या बैठकीतील तपशील समजून घेण्याची माझी इच्छा नाही. गोरगरिबांच्या पोरांना अन्याय सहन करावा लागत असताना हे नेते हसण्यावारी नेत आहेत. यांना जनता सांभाळणारे सरकार म्हणायचे का? असा सवालही जरांगे-पाटील यांनी केला. फडणवीस यांनी चर्चेसाठी यावे आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलावत आहोत; पण ते येत नाहीत. तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल, तर मला बोलता येतेय तोवर चर्चेसाठी या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी यावे, रस्त्यावर तुम्हाला कोणीही अडवणार नाही. माझे मराठे तुम्हाला संरक्षण देतील, याचा पुनरुच्चारही जरांगे-पाटील यांनी केला.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *