धुळे: जिल्ह्यात ९ ते २० ऑगस्टदरम्यान ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम | महातंत्र








धुळे, महातंत्र वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत ते महानगर स्तरावर स्मृती शिळा लावण्यात येणार असून या ठिकाणी स्मृती वन साकारण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, धुळे जिल्ह्यात 9 ते 20 ऑगस्ट दरम्यान ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम गाव आणि गटस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायत तसेच महापालिका क्षेत्रात आयोजित करण्यात येणार आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक शिलाफलक उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरी भागामध्ये नगरपालिका तसेच महापालिका क्षेत्रात एक असे शिलाफलक (स्मारक फलक) उभारले जातील. या शिलाफलकावर जिल्हयातील देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीर, स्वातंत्र्य सैनिकांची नावे या शिलाफलकावर राहतील. हे शिलाफलक 15 ऑगस्ट पर्यंत उभारुन त्याठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याठिकाणी 75 वृक्षाची लहान ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी सामुहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात येणार आहे. प्रत्येक गावस्तरावर 9 ते 15 ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 16 ते 20 ऑगस्ट या कालावधीत महापालिका, नगरपालिका, पंचायतस्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी (जन भागीदारी) https://merimaatimeradesh.gov.in/ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, लोक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील, अशी माहिती गोयल यांनी दिली आहे.

हेही वाचा 









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *