Congress: काँग्रेसचा १६ ऑगस्टपासून पदयात्रा, बसयात्रेतून महाराष्ट्रात झंझावात | महातंत्र








नागपूर: महातंत्र वृत्तसेवा : एकीकडे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी 16 ऑगस्टपासून पदयात्रेच्या माध्यमातून विदर्भासह महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर एक बसयात्रा देखील काढली जाणार आहे.

राज्यातील सहा विभागात ही पदयात्रा काढण्यात येणार असून नागपूर विभागातील पदयात्रेचे नेतृत्व स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार आहेत. ही पदयात्रा नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात फिरेल. प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे समन्वयक असतील. अमरावती विभागात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पदयात्रेच्या माध्यमातून अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्हे पिंजून काढतील. याचप्रमाणे मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्र विभागात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मुंबईत माजी मंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघणार आहे.

ही पदयात्रा झाल्यानंतर लगेच बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे. भाजपा सरकारने जनतेला खोटी आश्वासने देत जनतेची दिशाभूल केली. यादृष्टीने विविध सभांच्या माध्यमातून हे सर्व मुद्दे जनतेच्या समोर मांडले जाणार आहेत.
दरम्यान, राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. नागपूर -रामटेक लोकसभा मतदार संघाची जबाबदारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली आहे. हे निरीक्षक ४८ मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेत स्थानिक राजकीय परिस्थिती, पक्ष संघटनेची ताकद या सर्वांचा अभ्यास करून १५ ऑगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल सादर करणार आहेत.

दरम्यान, देशातील हुकूमशाही, मोदी सरकार विरोधात लढणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने काँग्रेसही आता भाजप प्रमाणे घरोघरी जाणार आहे.

हेही वाचा 









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *