देशाचे व्यापक सामाजिक, राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्वाचे : राज्यपाल रमेश बैस | महातंत्र

वर्धा; महातंत्र वृत्तसेवा : देशाचे व्यापक सामाजिक, राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांचे मोठे योगदान आहे. देशाला जागतिकस्तरावर पुढे ठेवण्यासाठी यापुढे देखील या संस्था महत्वाचे योगदान देतील. नव्या शैक्षणिक धोरणाने परिवर्तनाचा दृष्टीकोण ठेवला आहे. हे धोरण नव्या पिढीला मातृभाषेत शिक्षणाला प्रोत्साहन देते. युवकांनी देशाला सर्वच क्षेत्रात पुढे नेण्यासाठी तयार झाले पाहिजे, असे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व शिवशंकर सभागृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागपूर विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे उपकुलपती डॉ. प्रशांत बोकारे, महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री, आ.डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, पोलिस अधीक्षक नूरुल हसन, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.

भारताने जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. देशात होत असलेली शैक्षणिक प्रगती आपल्या विकासाचा आधार आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने परिवर्तनवादी दृष्टीकोण स्विकारला आहे. आजचे जग हे कौशल्याचे आहे. कौशल्य अंगिकारत आम्हाला प्रयोगशिल होणे आवश्यक आहे. भारत जगातील सर्वात तरुण देश आहे. जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून भारत करत आहे, असे राज्यपाल म्हणाले.

विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेवर नव्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, अभ्यासक्रमांचे सुसुत्रिकरण, आधुनिकिकरण व उच्च शिक्षण प्रणालीचा अंगिकार करावा लागेल. आजच्या आधुनिक काळात केवळ साक्षर होऊन उपयोग नाही तर एआय साक्षर होणे गरजेचे आहे. युवकांमध्ये मोठी ताकद आहे. युवकांनी संपुर्ण जग आपले कार्यक्षेत्र मानले पाहिजे. स्वत:ला काही क्षेत्रांपुरते मर्यादीत न ठेवता देशातील कोणतेही राज्य आणि जगात जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्यपालांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन राज्यपालांच्याहस्ते गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख सादर केला. उपकुलपती डॉ. सुभाष चौधरी, डॉ. प्रशांत बोकारे, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन करत आभार संध्या शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने बांधण्यात आलेल्या शिवशंकर सभागृहाचे उद्घाटन महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. दादाराव केचे, आ.डॅा.पंकज भोयर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचे उपकुलपती डॅा.सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे उपकुलपती डॅा.प्रशांत बोकारे, महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस यांचे वर्धा येथे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सूतमाला देऊन स्वागत केले. यावेळी नागपूर विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर जिल्हाधिकार नरेंद फुलझेले, महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्नीहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *