नागपूर28 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नागपूर शहरातील भाजपच्या महिला नेत्या सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर मानकापूर पोलीस पथक जबलपूरकडे रवाना झाले असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. मात्र, आठवडा उलटूनही थांगपत्ता लागलेला नाही. दरम्यान, व्यावसायिक स्पर्धेतून हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांपुढे देखील या प्रकरणी तपासाचे मोठे आव्हान आहे.
एक महिन्यापूर्वी जबलपूरमधील कुख्यात गुन्हेगार पप्पू शाहू याने खान यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. 1 ऑगस्टला खान या जबलपूरला गेल्या. दोन दिवसांनी संपर्क न झाल्याने त्यांच्या आईने मानकापूर पोलिसांत सना या बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांची दोन पथके जबलपूरला गेली. पोलिसांनी सना व पप्पूचा शोध घेतला. मात्र, दोघेही आढळून आले नाहीत.
पोलिसांनी त्यांच्या व्यावसायिक पार्टनरसोबत संपर्क साधल असता, तो सुद्धा बेपत्ता असल्याचे कळत आहे. दरम्यान, सना खान नेमक्या गेल्या तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सना खान या पश्चिम नागपुरातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्या आहेत.
त्यांची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांना अद्याप सना खान यांचा मृतदेह मिळालेला नाही, त्यामुळे या तर्काला कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला तसेच मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता नागपुरातील भाजपची महिला कार्यकर्ताच बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.