पुणे9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
वैद्यकीय महाविद्यालयच्या व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्यासाठी 16 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे प्रकरणात पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठात्यास एसीबीने मंगळवारी अटक केली आहे.
डॉ. आशिष श्रीनाथ बंगिनवार (रा. नांदेड सिटी, सिंहगड रस्ता,पुणे) असे ताब्यात घेतलेल्या अधिष्ठाताचे नाव आहे.डॉ. बंगिनवार यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या 15 टक्के व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश मिळण्यासाठी त्यांनी एका विद्यार्थ्याच्या पालकांकडे 16 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील 10 लाख रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. या कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी 22 लाख 50 हजार रुपये शुल्क आहे. मात्र त्या व्यतिरिक्त 16 लाख रुपये देण्याची मागणी डॉ. बंगिनवार यांनी केली होती.
न्यायालयात आरोपीला हजर केल्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की,डॉ. बंगिनवार यांच्या आवाजाचा नमुना घेणे अद्याप बाकी आहे. वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी आंतररुग्ण म्हणून भरती करून घेतले होते. त्यानंतर त्यांना बुधवारी (ता 9) दुपारी न्यायालयात हजर करण्यासाठी डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आरोपीकडे तपास करता आलेला नाही. त्यामुळे या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपीस चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आहे. तेव्हापासून आरोपी डॉ. बंगिनवार हे तेथे अधिष्ठाता आहेत. सध्या कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे आरोपीने आणखी विद्यार्थ्यांकडून प्रवेश मिळवून देण्यासाठी पैसे घेतले असण्याची दाट शक्यता आहे.