धुळे
धुळे, महातंत्र वृत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील तूर आणि कापसाच्या पिकाच्या आडोशाला गांजाची शेती केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या कारवाईत तब्बल तीन कोटी रुपयाचे गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून शेतकऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थाच्या तस्करी संदर्भात कोणास माहिती असल्यास ती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या हेल्पलाइनला तातडीने कळवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.
शिरपूर तालुक्यातील लाकडे हनुमान शिवारामध्ये एका शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी तसेच सुनील वसावे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, मयूर पाटील ,योगेश जगताप ,किशोर पाटील, जगदीश सूर्यवंशी आदी पथकाला कारवाई करण्यासाठी पाठवले. या पथकाने चौकशी केली असता त्यांना लाकडे हनुमान गावाच्या शिवारामध्ये कापूस आणि तूर या पिकाच्या आडोशाला गांजाची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याची बाब निदर्शनास आली. ही लागवड देवा कहारू पावरा याने केल्याचे देखील प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पथकाने या शेतामधून सुमारे सहा फूट उंचीपर्यंत वाढलेले गांजाची वनस्पती ताब्यात घेतली. या वनस्पतीचे वजन सहा हजार किलो असून त्याची किंमत तीन कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या संदर्भात देवा पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही कारवाई यशस्वी केल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला वीस हजार रुपयांचे बक्षीस पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे अमली पदार्थ संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास ती अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या हेल्पलाइनवर कळवावी. त्याचप्रमाणे या संदर्भातील फोटो व्हिडिओ पाठवल्यास नाव गुप्त ठेवले जाईल, असे यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचलंत का?