महातंत्र ऑनलाईन डेस्क : १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या पराभवामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. याच धक्क्यामध्ये तिरुपतीमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे. ज्योतिष कुमार यादव असे मृताचे नाव आहे.
ज्योतिष कुमार हा तरुण बेंगळुरू येथे सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होता. दिवाळीच्या सुट्टीसाठी तो घरी आला होता. कुटुंब आणि मित्रांसोबत घरी टीव्हीवर क्रिकेटचा विश्वचषक सामना पाहत होता. सामना संपल्यानंतर काही वेळातच त्याच्या छातीत दुखू लागलं आणि तो खाली कोसळला. त्याला तात्काळ तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ज्योतिषच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम फलंदाजी केल्यानंतर भारत २४० धावांवर सर्वबाद झाला तेव्हा ज्योतिष थोडा तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त झाला होता. नंतर जेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने झटपट तीन विकेट गमावल्या तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. पण त्यानंतर, ऑस्ट्रेलिया लक्ष्य गाठत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले. विजयाच्या जवळ आलेला ऑस्ट्रेलिया आता भारताचा पराभव करणार या विचाराने ज्योतिष चिंताग्रस्त झाला. पराभव पक्का झाल्यानंतर अचानक ज्योतिषच्या छातीत दुखू लागले आणि तो कोसळला.
हेही वाचा