गावबंदी झुगारून अजितदादा बारामतीत येणार? मुश्रीफांचा ताफा अडवला, खासदाराची कार फोडली

Maratha Reservation Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू झालेल्या गावबंदी आंदोलनाचा फटका चक्क उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसणाराय.. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे बारामतीतच अजितदादांना गावबंदी करण्यात आलीय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम अजित पवारांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. मात्र, अजितदादांना इथं पाय ठेवू देणार नाही, असा थेट इशारा सकल मराठा संघटनेनं दिलाय… यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनानं बैठक घेऊन मराठा आंदोलकांची मनधरणी केली. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अजितदादा आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

तर, दुसरीकडं कोल्हापुरातही आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी पालकमंत्री हसन मुश्रीफांना घेराव घातला. पाटगावला कार्यक्रमासाठी निघालेल्या मुश्रीफांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली… त्याआधी कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरातही सकल मराठा समाजानं मुश्रीफांची वाट अडवली.

आक्रमक मराठा आंदोलकांचे खळ्ळ खटॅक

नांदेडमध्ये तर आक्रमक मराठा आंदोलकांनी थेट खळ्ळ खटॅकच केलं. नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गावबंदी मोडून गावात प्रवेश केला. त्यामुळं संतापलेल्या मराठा आंदोलकांनी चिखलीकरांच्या ताफ्यातल्या दोन गाड्या फोडल्या.. कंधारमधल्या अंबुलगा गावात हा प्रकार घडला. त्यावर चिखलीकरांनी नाराजी व्यक्त केली. 

Related News

भाजप आमदार मोनिक राजळेंनाही करावा लागला मराठा समाजाच्या रोषाचा सामना

अहमदनगरच्या पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिक राजळेंनाही मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. त्या खरवंडीला आल्या असताना आंदोलकांनी गाड्या अडवल्या. मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या नाहीतर राजीनामा द्या अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण आंदोलन सुरू केल्यानं आधीच सरकारचं टेन्शन वाढलंय. त्यात गावबंदीचं लोन राज्यभरात पसरू लागल्यानं नेत्यांना धडकी भरलीय. मराठा आंदोलकांनी आता थेट अजित पवारांना बारामतीतच गावबंदी करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं अजित पवार काय भूमिका घेतात, याकडं लक्ष लागलंय. अजित पवार हा बंदी आदेश झुगारून बारामतीत येणार का?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. आज सकाळपासून उपोषणस्थळी अनेक गावांतून मराठा बांधव ट्रॅक्टरसह उपस्थिती लावत आहेत. मरळक, आलेगाव येथून ट्रॅक्टर मोर्चा काढून आंदोलन उपोषणस्थळी पोहोचले. 

मराठा आंदोलकांनी दिल्या गो बॅकच्या घोषणा

धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी शिंदे समितीची गाडी अडवली. निवृत्त न्यायमूर्ती शशिकांत शिंदे आणि समितीचे इतर सदस्या धाराशिवमध्ये जात असताना त्यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठा आंदोलकांनी गो बॅकच्या घोषणाही यावेळी दिल्या. शिंदे यांची समिती कुणबी दाखले देण्यासंदर्भात योग्य कागदपत्रांचं मराठवाड्यात संशोधन करत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांचे दौरे ही समिती करत आहे. 
 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *