अमरावती8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
बाह्य यंत्रणेद्वारे कामगार भरती या सुशिक्षित बेरोजगारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न भंगविणाऱ्या प्रक्रियेच्या विरोधात आज, सोमवार, 18 सप्टेंबरला सरकारी, निमसरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी मध्यान्ह सुटीत आपापल्या कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनात जिल्हाभरातील 5 हजारांवर कामगार-कर्मचाऱ्यांनी भाग घेतला, असा दावा सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने केला आहे.
समितीचे निमंत्रक डी. एस. पवार यांच्या नेतृत्वात दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर त्या कार्यालयाचे अधीक्षक यांना मागण्यांचे निवेदन सादर करुन राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. समन्यव समितीच्या दाव्यानुसार शासनाच्या बाह्य भरतीच्या निर्णयामुळे भविष्यात शासकीय नोकऱ्यांसाठीची दारे बंद होणार असून राखीव जाती-जमातीमधील नागरिकांना आरक्षण आदी सुविधांचा कोणताही लाभ मिळणार नाही.
त्यामुळे एक फार मोठी सामाजिक समस्या उभी ठाकणार असून शासकिय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आदी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. दुपारी २ ते ३ या वेळात या कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर एकत्र जमून शासनाच्या धोरणाविरुद्ध निदर्शने केली. राज्य सरकारने अलिकडेच अतिकुशल, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी ९ खाजगी कंपन्यांना कंत्राट दिले आहेत. या कंपन्यांमार्फतच यापुढची भरती प्रक्रिया राबविली जाणार असून ती तात्पुरत्या स्वरुपाची असेल. त्यामुळे शासकीय सेवेत नोकरी मिळण्याचे बेरोजगारांचे स्वप्न भंगणार आहे. या धोरणांस संघटनेचा तीव्र विरोध आहे. यासाठी टप्याटप्याने आंदोलन करण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे. आजची निदर्शने हा त्या आंदोलनाचा पहिला टप्पा होता.
महाराष्ट्रात सध्या ३२ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण सरकारी सेवेत जाण्यासाठी एम.पी.एस.सी आणि शासनाच्या विविध विभागातील अनेक संवर्गांच्या रिक्त पदांच्या परीक्षेची तयारी करीत आहेत. त्याचवेळी राज्यात जवळपास २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. रिक्त पदांच्या संख्येनुसार शंभर पट सुशिक्षित तरूण अर्ज करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना शासनाने कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करणे हा सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनावेळी सांगण्यात आले.
आंदोलनात समन्वय समितीचे निमंत्रक कॉम्रेड डी. एस. पवार यांच्यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष एच. बी. घोम, इतर पदाधिकारी विजय सावरकर, श्रीकृष्ण मोहोरे, ॲड. एस.डी. कपाळे, एस.डब्ल्यु. शिर्के, भास्कर रिठे, डी.व्ही. देशमुख, डी. एम पाडळकर, विजय सोळंके, आर.एस. राऊत, एन.एस. पाचघरे, सुभाष पांडे, सुनील देशमुख, निळकंठ ढोके, चंदुभाऊ बानुवाकोडे आदी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.