मुंबई24 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीही फूट पडली नाही, असं शरद पवारांनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं, तरीही निवडणूक आयोगानं पक्षफुटीसंदर्भात सुनावणीची तारीख दिली आहे, असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीत फूट; नेत्यांमध्ये संभ्रम
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. मोजके नेते सोडले तर कोणता आमदार कोणत्या गटात आहे, याचं चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजकीय नेत्यांसह लोकांमध्येही याबाबत संभ्रम आहे. पक्षात कोणतीही फूट पडली नाही, असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे मान्य केले आहे. तसेच दोन्ही गटांना 6 ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावलं आहे.
पवार साहेबांनी स्पष्ट सांगितले
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘शरद पवारांनी निवडणूक आयोगाला जे उत्तर दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. मला कुणीही विरोध केला नाही. कुणीही माझ्या धोरणांना जाहीरपणे विरोध केला नाही. कुणीही वेगळा सूर काढला नाही. हजारो लोकांच्या उपस्थितीत माझी अध्यक्षपदी निवड झाली. सगळेच मुद्दे शरद पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात मांडले होते.
भेटीची वेळ मागूनही नाही दिली
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलाही वाद नसल्यामुळे तुमच्याकडे जो पत्रव्यवहार झाला आहे. त्यासंदर्भात आम्ही तुम्हाला भेटू इच्छितो, आम्हाला वेळ द्या, असं शरद पवारांनी सांगितलं होत. पण निवडणूक आयोगाने वेळ न देता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद आहे, हे अचानक ठरवलं आणि सुनावणीसाठी 6 ऑक्टोबरला बोलावलं. निवडणूक आयोगाने शरद पवारांची बाजू मांडण्यासाठी एक संधी देणं आवश्यक होतं, असंही जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाविषयीची अन्य बातमी
जयंत पाटलांना सणासुदीला कस बोलाव समजत नाही!:त्यांना फक्त राजकारण करायचं असतं; फोडाफोडीच्या टीकेवरुन फडणवीसांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फोडाफोडीपेक्षा प्रगतीच्या राजकारणाकडे पाहण्याची सुबुद्धी गणरायाने राज्यकर्त्यांना द्यावी, यावर्षी त्याची फारच गरज आहे, असा टोला जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला. या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. – क्लिक करा, वाचा संपूर्ण बातमी