धुळे; महातंत्र वृत्तसेवा : आपल्या नृत्य कलेच्या तालावर युवकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलचे वडील बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बेवारस अवस्थेत असणाऱ्या रवींद्र पाटील यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यांच्या खिशात आढळलेल्या कागदपत्रांच्या आधारावर त्यांची ओळख पटली. यानंतर संबंधित नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.
धुळे शहरात नागपूर-सुरत रस्त्यावर आजळकर नगर परिसरात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने सोशल मीडियावरून त्यांचे फोटो व्हायरल करण्यात आले. हे फोटो पाहून स्वराज्य फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
बेशुद्ध असणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवले. त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. यावेळी या व्यक्तीच्या खिशात असलेल्या आधार कार्डवर त्यांचे नाव रवींद्र पाटील असून ते चोपडा तालुक्यातील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले. व्हायरल झालेला फोटो पाहून आणि वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची माहिती रवींद्र पाटील यांच्या नातेवाईकांना मिळाल्याने त्यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली.
यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आजारी असणारे रवींद्र पाटील हे गौतमी पाटीलचे वडील असल्याची बाब पुढे आली. विशेषतः गौतमी पाटील ही धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आहे. तर तिचे वडील हे चोपडा तालुक्यात राहत होते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून गौतमी पाटील व तिची आई या वडिलांपासून विभक्त शिंदखेडा येथे राहत होत्या. याच गावात तिनी प्राथमिक शिक्षण घेऊन नृत्य कलेचे धडे गिरवण्यासाठी धुळे जिल्हा सोडून पुण्यात स्थायिक झाली. यानंतर तिने याच क्षेत्रात यश मिळवले.
हेही वाचा;