शांततेत गणेशोत्सव साजरा करावा: जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांचे आवाहन; म्हणाले- गणेश मंडळांनी डीजेचा वापर टाळावा

अहमदनगर5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण (28 सप्टेंबर) रोजी गुरुवारी एकाच दिवशी आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक एकोपा राखा. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुस्लिम समाजाने ईदच्या मिरवणुका पुढे ढकलल्या आहेत. येथील अनुकरण अन्य जिल्ह्यात होत आहे. यामुळे पोलिस चांगले काम करतील. अडचणी येणार नाही. गणेश मंडळांनी आक्षेपार्ह देखाव्यांचे सादरीकरण करू नये. वर्गणीसाठी दबाव, जबरदस्ती करू नका. डीजेच्या वापर टाळा. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे करा, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी केले.

संगमनेर येथील प्रशासकीय भवनात शनिवारी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ओला बोलत होते. प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, गणेश ओमणे, निरीक्षक भगवान मथुरे, देविदास ढुमणे, जलसंपदा विभागाच्या स्थापत्य अभियंत्या कल्याणी घोडेकर, वीज वितरणचे सहायक अभियंता सुनील अहिरे, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र गुंजाळ, टंचाई विभागाचे वरिष्ठ सहायक संजय अरगडे यावेळी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक ओला म्हणाले, गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे. सर्व विभागांची अधिकृत परवानगी घ्यावी. मंडपाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महिला व मुलींची छेडछाड होणार नाही, याची दक्षता घ्यावी. भाविकांना त्रास होणार नाही, यासाठी ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पुढाकार घ्या. पोलिसांना सहकार्य करा. गणेशोत्सवात विजेचा तुटवडा होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त, रस्त्यांची डागडुजी व गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्याचे पालिकेला सूचित करण्यात आले. संगमनेरला पारंपरिक इतिहास आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण पूरक मूर्ती, सजावट व ध्वनी प्रदूषण रहित वातावरण या निकषावर आधारित स्पर्धेतील पहिले बक्षीस संगमनेरला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्दोजक मनीष मालपाणी, विश्वास मुर्तडक, कैलास वाकचौरे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, अमर कतारी, किशोर पवार, नुरमोहमद शेख, शहर काझी सय्यद अब्दुल रकीब, अक्षय थोरात, अमोल खताळ, किशोर कालडा आदींनी सूचना केल्या. प्रास्ताविक पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले. आभार उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी मानले.

गरजू विद्यार्थीनीला देणार सायकल

गरजवंत गरीब विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळांनी १ सायकल द्यावी, अशी सूचना किशोर पवार यांनी मांडली. या उपक्रमाची सुरुवात शहर पोलिसांकडून करण्यात येईल. गरजवंत विद्यार्थिनीला १ सायकल दिली जाईल, अशी घोषणा पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केली. तर बैठकीत पत्रकार किशोर कालडा यांच्या शेरोशाहिरीने हशा पिकला. अधिकारी व उपस्थितांनी त्यांना दाद दिली.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *