मुंबई43 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्यभरात आज ढगाळ हवामान आहे. शनिवारी भंडारा, गडचिरोलीसह राज्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. आज उत्तर कोकणातील ठाणे, पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकणासह नंदूरबार, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जाणून घेऊया राज्यभरातील आजच्या महत्त्वाच्या घटना
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभावर होणार मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात येणार आहे. राज्यातही अनेक ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत.
- दुष्काळी स्थिती जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने निकष लावले आहेत. राज्यभर झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता दुष्काळ जाहीर होऊच शकत नाही. प्रत्यक्षात मात्र पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. शिवाय राज्यातील प्रमुख जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. वाचा सविस्तर
- तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या नावावर क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन व इतर पाच-सहा ॲपवरून पावणेचार लाख रुपये कर्ज घेतले. मात्र, कर्जाचे हप्ते न फेडता तरुणीला सातत्याने भांडण करून त्रास दिला. प्रियकर आणि वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रसिका ऊर्फ राणी रवींद्र दिवटे (२५, रा. घोरपडी ,पुणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. वाचा सविस्तर
- सात वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरात झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत शनिवारी मराठवाड्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०३ निर्णयांची घोषणा केली. त्यासाठी ४६ हजार ५७९ कोटी ३४ लाख रुपयांची तरतूद करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेल्या बैठकीत सात वर्षांपूर्वी ३१ निर्णयांसाठी ४९ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. या वेळी निर्णयांमध्ये तिप्पट वाढ झाली असली तरी बजेट मात्र गेल्या वेळच्या तुलनेत २,५०० कोटींनी घटले आहे. वाचा सविस्तर
- तिसरी मुलगी झाल्यानं संतापलेल्या आईनं आपल्या पोटच्या पाच दिवसांच्या चिमुकलीची गळा घोटून हत्या केली. पालघरमधील तारापूर परिसरात आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याप्रकरणी तारापूर पोलिसांनी आईला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
- एक महिन्याच्या खंडानंतर पाऊस विदर्भावर मेरहबान झाला आहे. पावसाने पुन्हा कमबॅक केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. दोन दिवसांपासून विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती जिल्ह्यात चांगला पाऊस बरसत आहे. पावसामुळे नागपूर विभागात 76 टक्के जलसाठा असून अमरावती विभागात 75 टक्के जलसाठा सध्या धरणात आहे.
- गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं वैनगंगा नदीला पूर आला आहे. दुथडी भरुन वाहणारी वैनगंगा नदी आणि गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमुळं भंडारा शहराला पुराचा फटका बसला आहे. शहरातील अनेक सखल भागात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक कुटुंबाला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
- पुण्यात गणेशोत्सवात दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी असेल. पुणे वाहतूक पोलिसांनी तसे आदेश दिलेत. 16 सप्टेंबरपासून गणपती विसर्जनापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यावर जड वाहनांना बंदी असेल. लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, जंगली महाराज रोड, एफसी कॉलेज रोडवर जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.
- प्रदीप कुरुलकर प्रकरणी ATS चा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. प्रदीप कुरुलकर यांच्या पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाईस लेयर चाचणीच्या मागणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. प्रदीप कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचा एटीएसकडून आरोप करण्यात आला आहे. त्यासाठी कुरुलकरांची पॉलीग्राफ चाचणी करू द्या असा अर्ज ATS कडून करण्यात आला होता. पण पॉलीग्राफ चाचणीला कुरुलकरांनी नकार दिला. अशा चाचण्या करण्यासाठी आरोपीची परवानगी आवश्यक असते. असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.