संभ्रमात राहू नका, घड्याळ अजितदादांनाच मिळेल!: पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांची भविष्यवाणी

अमरावती4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

शरद पवार हे माझे नेते होते, आहेत आणि राहणारच अशी ग्वाही देत असतानाच 53 पैकी 43 आमदार असलेला अजितदादा पवार यांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि भविष्यात याच पक्षाला ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह मिळेल, अशी भविष्यवाणी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. ते अमरावती येथे बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राकाँची पहिली सभा (जनचेतना महासभा) आज सायंकाळी येथील सांस्कृतिक भवनात पार पडली. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या सभेला उपस्थित असल्याने सभागृह खच्चून भरले होते. आमदार अमोल मिटकरी, रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला नेत्या सुरेखाताई ठाकरे, वसंतराव घुईखेडकर, संतोष महात्मे, डॉ. गणेश खारकर, उर्दू शिक्षक संघटनेचे जहरोश गाझी, विदर्भ कबड्डी असोसीएशनचे जीतू ठाकूर, भूषण बनसोड, अॅड. बाबुराव बेलसरे, प्रा. प्रशांत डवरे आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

खासदार पटेल पुढे म्हणाले, आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत. २०१९ सालीदेखील याच भूमिकेतून आम्ही शिवसेनेसोबत जुळवून घेतले होते आणि आताही त्याच तत्वाला अनुसरुन आम्ही भाजप-सेनेसोबत जुळवून घेत सत्तेत आलो आहोत. मग चूक झाली कुठे ? राष्ट्रवादीचा खरा विचार घेऊनच आम्ही सामान्य माणसाच्या, समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी एकत्र आलो आहे, हे साहेबांनी (शरद पवार यांनी) लक्षात घ्यायला हवे. दरम्यान उपस्थितांच्या गर्दीकडे बोट दाखवत ते म्हणाले, जनतेने हे समजून घेतले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कसलाही संभ्रम बाळगू नये. ५३ पैकी ४३ आमदार, विविध ठिकाणचे पदाधिकारी, पक्षाची एकूण रचना ही आपल्यासोबत आहे. त्यामुळे पक्षाचे घड्याळ हे चिन्ह आपल्यालाच मिळेल, यात शंका नाही.

यावे‌ळी आमदार अमोल मिटकरी, सूरज चव्हाण, संजय खोडके, सुरेखाताई ठाकरे, जहरोश गाझी, जीतू ठाकुर, भूषण बनसोड आदींचीही भाषणे झाली. कार्यक्रमादरम्यान शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. अभिजीत इंगोले व अभियंता भवनचे शिल्पकार निवृत्त अभियंता जवंजाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *