राज्यावर दुष्काळाचे सावट!: ऑगस्ट महिन्यात शतकातील सर्वाधिक कमी पावसाची नोंद; राज्यात – 58 टक्के पावसाची तुट

मुंबईएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

देशासह महाराष्ट्र राज्यावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. तीन महिन्यात पावसाची मोठी तूट दिसून आली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये पावसाने पाठ फिरवल्याचे दिसलेय.

ऑगस्ट महिन्यात भारतात शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात फक्त 160 मिमीच्या जवळपास पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट 2023 हे मान्सून वर्ष 1901 नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना म्हणून नोंदवला गेला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची स्थिती ओढावली आहे.

पुन्हा मान्सून ब्रेकची स्थिती
1 जूनपासून संपूर्ण देशात मान्सूनमध्ये पावसाची तूट वाढत गेली. ऑगस्टअखेरपर्यंत देशातील पावसाची तूट 9 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यातच पुन्हा एकदा मान्सून ब्रेकची स्थिती असल्याने ही तूट आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

देशातील काही भागात सध्या चांगला पाऊस झाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 22 टक्के पावसाची तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील 1 जूनपासून सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यात – 58 टक्के पावसाची तूट
ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथे सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे. त्या खालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

केरळमध्ये पावसाची मोठी तूट
हवामान विभागानं देशात आत्तापर्यत झालेल्या पावसाची माहिती दिली आहे. देशात सरासरीच्या 9 टक्के पाऊस कमी झाला आहे. आत्तापर्यंत देशात 91 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये केरळमध्ये यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळात आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या 48 टक्के पावसाची तूट झाली आहे.

दुष्काळ जाहीर करा, सुळेंची मागणी

राज्यातील पावसाची स्थिती पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना निधी द्यावा तसेच राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील केली आहे. परंतू सरकार हवामान विभागाच्या अंदाजानुसार सद्या कोणतेही ठोस पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *