चंद्रपूर, महातंत्र वृत्तसेवा : शेतीच्या जुन्या वादातून दुपटटयाने गळा आवळून एका इसमाचा खून केल्याची घटना मूल तालुक्यातील डोनी येथे बैलपोळयाच्या दिवशी रात्री घडली. या प्रकरणी आरोपी विजयपाल गोंविदराव अलाम (वय 25) याला पोलीसांनी अटक केली आहे. अमृत बाजीराव अलाम (वय 60) असे मृतकाचे नाव आहे.
मूल तालुक्यातील डोनी येथे अलाम कुटुंबीय राहतात. अमृत अलाम आणि विजयपाल अलाम या दोघांमध्ये दोन वर्षांपासून शेतीचा जुना वाद होता. हे दोघेही चुलत नातेवाईक आहेत. सद्या शेतीमध्ये धानाचे पीक घेतले आहे. गुरूवारी बैलपोळयाच्या दिवशी समाजमंदिराजवळ विजयपालने अमृत सोबत शेतीचा जुना वाद उकरून काढत भांडण केले.
जून्या वादाचा वचपा काढण्याच्या उददेशाने रागाच्या भरात पांढ-या रंगाच्या दुपटयाने अमृतचे पाठीमागे दोन्ही हात बांधले. त्याच दुपटटयाने गळा आवळून त्याचा खून केला. ही घटना डोनी येथे वा-यासारखी पसरली.कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता अमृत बाजीराव अलाम याचा मृतदेह समाज मंदिराच्या पायरी जवळ आढळून आला. मृतकाची पत्नी अन्नपूर्णाअलाम हिने मूल पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी आरोपी विजयपाल गोंविदराव अलाम यांस अटक केली आहे. आरोपीवर भांदविच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुमित परतेकी करीत आहे.