सत्ताधार्‍यांच्या त्रासामुळे शेतकर्‍यांनी म्हशी विकल्या : खा. धनंजय महाडिक | महातंत्र
कोल्हापूर, महातंत्र वृत्तसेवा : गोकुळचे दूध संकलन कमी झाले आहे. संकलन वाढविण्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करत आहेत. वीस लाख लिटर दूध संकलन करू, असा दावा करणारे गावोगावी फिरून म्हशी खरेदी करण्याच्या विनवण्या करत आहेत. परंतु यांच्या त्रासाला कंटाळून शेतकर्‍यांवर म्हशी विकण्याची वेळ आल्याचा घणाघाती आरोप खा. धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. गोकुळ कारभारामध्ये गैर काही नसेल तर चौकशी होण्यास काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी केला.

गोकुळच्या निवडणुकीत वासाचे दूध परत देऊ, शेतकर्‍यांना दोन रुपये जादा दर देऊ असा अजेंडा घेऊन सध्याची मंडळी सत्तेवर आली. त्यातील काहीच झाले नाही. चार रुपये वाढवून दूध उत्पादकाला दोन रुपये दिले. पशुखाद्याचे दर वाढविले. हे दूध उत्पादक शेतकरी पहात आहेत. त्यांच्यासाठी शौमिका महाडिक लढत आहेत. इतर संचालकांबाबत आपण काय बोलणार नाही. वीस लाख लिटर दूध संकलन करू म्हणणारे गावोगावी फिरून म्हशी खरेदी करण्याची विनंती करत आहेत. परंतु यांच्या त्रासाला कंटाळून शेतकर्‍यांनी म्हशी विकल्या. त्यामुळे संवाद यात्रेत गावोगावी त्यांना रोषाला सामोरे जावे लागेल, असे महाडिक यांनी सांगितले.

गोकुळच्या चौकशीबाबत ते म्हणाले, लेखापरीक्षणामध्ये ज्या त्रुटी आढळल्या त्यावरून शौमिका महाडिक यांनी चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केली. त्याला स्थगिती मिळावी म्हणून गोकुळने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर दोन, तीन महिने सुनावणी झाल्यानंतर याचिका फेटाळली. याचिका फेटाळल्यामुळे शौमिका महाडिक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य असल्याचे दिसून येते. चौकशीत सत्य समोर येईल. सत्ताधारी असल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ अशा प्रकारची भूमिका मांडणे स्वाभाविक आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

‘वन नेशन वन इलेक्शन’चे स्वागतच

संसदेचे विशेष अधिवेशन दि. 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होत आहे. ‘वन नेशन वन इलेक्शन’चे विधेयक या अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. नक्की आपणास माहीत नाही. असे विधेयक आले तर आपण त्याचे स्वागत करू. यामुळे शासकीय यंत्रणेवर पडणारा ताण कमी होणार आहे. तसेच वर्षभर कोणत्या कोणत्या निवडणुका सुरूच असतात. त्याच्या आचरसंहितेमुळे विकास कामे रखडतात. त्यावर देखील मर्यादा येतील.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *