कोल्हापूर : युवक मित्र मंडळाकडून पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम | महातंत्र








कोल्हापूर; महातंत्र वृत्तसेवा : सामाजिक प्रबोधनासाठी अग्रेसर असणारे मंडळ म्हणून राजारामपुरी मधील ‘युवक मित्र मंडळाची’ ओळख आहे. जुन्या राजारामपुरी मध्ये ११ व्या गल्लीत १९७२ साली सामूहिक नेतृत्वातून युवक मित्र मंडळाची स्थापना झाली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणे ,समाजातील समस्यांना वाचा फोडणे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवणे, समाजातील दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देणे अशा अनेक सामाजिक जाणीवांमधून या मंडळाची स्थापना झालेली आहे. बाबा इंदुलकर हे या मंडळाच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सुरुवातीपासूनच मंडळाचे काम अगदी जोमाने झालेले आहे. 1977 साली आणीबाणीच्या काळामध्ये आणीबाणीवर भाष्य करणारा देखावा मंडळाकडून दाखवला होता.  कोल्हापूर शहरामध्ये 50 मायक्रोनच्या दररोज जवळपास दोन लाख प्लास्टिक पिशव्या कचऱ्यामध्ये समाविष्ट  होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मंडळाकडून पुणे येथील एका कंपनीच्या समन्वयाने एका लाईव्ह मशीनची व्यवस्था करून त्यामध्ये सर्व प्लास्टिक पिशव्या टाकण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.

युवक मित्र मंडळाने ‘अंकुर ‘या नावाने एक पर्यावरण पूरक उपक्रम राबवला होता. किचन वेस्ट चे डीकंपोस्टिंग करून त्यापासून  खत निर्मिती करणे असे या उपक्रमाचे स्वरूप होते. कोल्हापुरातील पंधराशे घरांमध्ये या खताची विक्री झाली आहे. तसेच कॉम्प्युटर अवेअरनेससाठी अनेक स्त्रियांना कॉम्प्युटर कोर्सचे मोफत प्रशिक्षण मंडळाकडून सलग चार वर्षे देण्यात आले होते. सध्याच्या युगात प्रत्येक घरांमध्ये सासू सुनेचे नाते काहीसे बरे आहे असं दिसत नाही. सुनेला स्वयंपाक करता येत नसल्यामुळे सासु सुनेच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन युवक मित्र मंडळाने नववधूंसाठी बेसिक कुकिंग साठी मोफत क्लासेस सुरू केले होते. इलेक्ट्रिसिटीसाठी सुद्धा मंडळांने फार मोठे कार्य केले आहे. इलेक्ट्रिसिटी ची बचत तसेच इलेक्ट्रिसिटी ची निर्मिती या गोष्टींसाठी मंडळाने योगदान दिले आहे. यावर्षी मंडळाकडून नदी प्रदूषणावर भाष्य करणारा देखावा साकारण्यात आला आहे. संत बाळूमामा यांच्या जीवनातील एका प्रसंगाला अनुसरून हा देखावा दाखवण्यात आला आहे.

युवक मित्र मंडळ हे कोल्हापुरातील असे एकमेव मंडळ आहे ज्याची कोणत्याही प्रकारची मिरवणूक निघत नाही. अगदी साध्या पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना करणे आणि कुंडामध्ये गणपतीचे विसर्जन करून मूर्ती दान करणे अशी या मंडळाची सुरुवातीपासून प्रथा आहे.२०-२२ सभासदांचे हे मंडळ आहे. आजपर्यंत या मंडळाला २० गणराया अवार्ड मिळालेले आहेत. युवक मित्र मंडळाने  नेहमीच सामाजिक कार्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *