अशीही बनवाबनवी: चक्क 3 मुख्यमंत्री, 4 क्रीडामंत्र्यांच्या 5 वर्षांत 4 वेळा घोषणा, तरीही क्रीडा विद्यापीठ कागदावरच

एकनाथ पाठक | छत्रपती संभाजीनगर38 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • २०१९ पासून महाराष्ट्रामध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापनेच्या नुसत्याच घोषणा; दोन्ही विद्यापीठाचे काम रखडले

जागतिक दर्जाच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मराठी खेळाडूंचा टक्का वाढवण्याची वल्गना करणाऱ्या महाराष्ट्रामध्येच प्रत्यक्षात खेळाडूंच्या प्रगतीला आडकाठी आहे. महाराष्ट्रात गत ५ वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री, चार क्रीडामंत्र्यांनी ४ वेळा क्रीडा विद्यापीठ स्थापनेच्या घाेषणा केल्या आहेत. प्रत्यक्षात क्रीडा विद्यापीठे मागील ५ वर्षांपासून फक्त कागदावरच असल्याची चिंताजनक बाब आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेची घाेषणा झाली. आता या विद्यापीठ उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचा आता शाेध घेतला जात आहे. १९९६ मध्ये क्रीडा विद्यापीठचा संकल्पना महाराष्ट्रानेच प्रथम मांडली. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा विद्यापीठाची संपादित १२० एकर जागा ओसाड अाहे. यावरही सहा महिन्यांपासून कामाला सुरुवात झालेली नाही. आता विद्यापीठ हे खेळाडूंसाठी स्वप्नच ठरण्याचे विदारक चित्र आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दाैड उद्घाटनप्रसंगी शनिवारी क्रीडामंत्री संजय बनसाेडे यांनी क्रीडा विद्यापीठ व निधीची घाेषणा केली.

Related News

१२० एकराला अतिक्रमणाचा धाेका!

मार्चमध्ये पुन्हा छत्रपती संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घाेषणा करण्यात आली. यातून या ठिकाणी दुसऱ्यांदा विद्यापीठ स्थापनेचे जाहीर करण्यात आले. पहिल्या घाेषणेनुसार कराेडीमध्ये १२० एकरचे संपादन झाले. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी घाेषणा झाली. मात्र, गत ६ महिन्यांपासून याही घाेषणेला ब्रेक लागला. याला आता अतिक्रमणाचा धाेका आहे.

१९९६ मध्ये महाराष्ट्राचीच क्रीडा विद्यापीठ स्थापनेची संकल्पना, मात्र गत २७ वर्षांपासून नुसतीच चर्चा आणि घाेषणांचा महापूर

पुण्यात आता ३०० एकरांसाठी कुलगुरू, ओएसडीची पायपीट

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी प्रशस्त जागेची अट आहे. मात्र, याच नियमाला खाे देत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री सुनील केदार यांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेची घाेषणा केली हाेती. मात्र, आता यासाठी जागेचा अभाव असल्याचे समाेर आले. यातून आता नव्याने नियुक्त करण्यात आलेले कुलगुरू ओमप्रकाश बकाेरिया आणि ओएसडी आनंद व्यंकटेशन सध्या प्रशस्त जागेचा शाेध घेत आहेत. या विद्यापीठासाठी आता ३०० एकर जागा विकत घेण्याचीही तयारी प्रशासनाने दर्शवली आहे.

घाेषणा हाेऊनही प्रत्यक्षात काम हाेइना

२०१९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री तावडे
औरंगाबाद (तत्कालीन) क्रीडा विद्यापीठ उभारणार
२०२१-२०२२ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, क्रीडामंत्री सुनील केदार
पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यात
२०२३ : मुख्यमंत्री शिंदे, क्रीडामंत्री गिरीश महाजन
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विद्यापीठ हाेणार
२०२३ : मुख्यमंत्री शिंदे, क्रीडामंत्री बनसोडे
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विद्यापीठ हाेणार व त्याला निधी देणार

६ महिन्यानंतर समिती स्थापनची घाेषणा

माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ मार्च २०२३ मध्ये दुसऱ्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापनेची घाेषणा केली. मात्र, या घाेषणेपासून आतापर्यंतच्या सहा महिन्यांत हालचालीच झालेल्या नाही. यासाठीच्या समितीचीही स्थापना रखडलेली आहे. शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीत समिती स्थापनेची घाेषणा झाली.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *