मुंबई; महातंत्र वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, जवान तसेच जवान-नि-वाहनचालक गट-क प्रवर्गातील आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे नामनिर्देशनाद्वारे भरण्याकरिता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे.
या विभागातील जवान व जवान-नि-वाहनचालक या पदांचे नियुक्ती प्राधिकारी म्हणून आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांना घोषित करून हा संवर्ग राज्यस्तरीय करण्यात आलेला आहे व यापूर्वी पदभरतीवर देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आलेली आहे. त्यामुळे जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांची राज्य स्तरावर बिंदुनामावली तपासून रिक्त पदे निश्चित करण्यात आलेली आहेत. नवीन आकृतिबंधानुसार मंजूर पदे व पदोन्नतीमुळे रिक्त झालेली पदे यामुळे जवान व जवान-नि-वाहनचालक पदसंख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळे पुनश्च या विभागातील लघुलेखक (निम्न श्रेणी) (५ पदे), लघुटंकलेखक (१८ पदे), जवान (५६८ पदे), जवान- नि-वाहनचालक (७३ पदे) आणि चपराशी (५३ पदे) संवर्गातील भरती प्रक्रियेबाबतचा सविस्तर तपशील या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचा कालावधी १७.११.२०२३ पासून ०१.१२.२०२३ रोजी सायंकाळी ५.०० अखेरपर्यंत आहे.
ज्या उमेदवारांनी जवान व जवान-नि-वाहनचालक या पदांसाठी या विभागाने ३०.०५.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीला अनुसरून अर्ज भरलेला असेल, परंतु शुल्क भरलेले नसेल तर त्यांनी परीक्षा शुल्क भरावे व त्यांच्या पूर्वींच्याच अर्जात आवश्यकतेनुसार दुरुस्ती करावी.
ही भरतीप्रक्रिया राज्यस्तरीय असल्यामुळे ३०.०५.२०२३ रोजीच्या जाहिरातीला अनुसरून जवान व जवान-नि- वाहनचालक पदासाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार तसेच १७.११.२०२३ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही राज्यस्तरीय समजण्यात येईल व त्यांना संपूर्ण राज्यात कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती स्वीकारावी लागेल.