मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
आदित्य ठाकरे यांनी एमएसआरडीसीचा टोल घोटाळा उघड केला आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्ग महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्याचं मेंटनन्स महापालिका करत आहे. तरीही या दोन्ही मार्गावरील टोलचा पैसा एमएसआरडीसीकडे जात आहे. एकीकडे लोकांच्या पैशातून रस्त्याची डागडुजी करायची अन् त्यांना टोल भरावा का द्यावा लागत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जाहिरात अन् टोलच्या पैशाचा घोळ
या रोडवरील जाहिरातीचा पैसाही एमएसआरडीसीकडे जात आहे. ही फार मोठी रक्कम आहे, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. या दोन्ही मार्गावरील टोलनाके बंद करा आणि तो पैसा महापालिकेला द्या, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
एमएसआरडीसीकडे का जातोय पैसा
आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी हा पर्दाफाश केला. मागच्या नोव्हेंबरमध्ये मुंबईतील वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पालिकेला सुपूर्द करण्यात आले आहेत. पालिकेने या दोन्ही रस्त्याची डागडुजी, रंगरंगोटी आदी गोष्टी करायच्या आहेत.
पालिकेच्या खर्चातूनच या गोष्टी होत आहेत. महापालिका मुंबईकरांकडून कर घेते. या कराच्या पैशातून या रस्त्याची डागडुजी आणि देखभाल केली जात आहे. या दोन प्रमुख रस्त्यांचं मेंटेनन्स महापालिका करतयं तर तिथल्या टोल नाक्याचा पैसा एमएसआरडीसीकडे का जातोय? या रस्त्यावरील होर्डिंगजचा पैसा एमएसआरडीसीकडे का जात आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
आमचे सरकार येताच टोल बंद करू
हे टोलनाके बंद व्हावेत म्हणून आम्ही आंदोलन करणार नाही. कोर्टात जाणार नाही. कारण हे सरकार औटघटकेचं आहे. सरकार जाताच आमचं सरकार येणार आहे. आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही या दोन्ही मार्गांवरील टोलनाके बंद करू, अशी घोषणाही त्यांनी केली. महापालिकेने एमआरएसडीसीला दोन हजार कोटी दिली आहेत. ते कशासाठी आणि का दिले आहेत हे माहीत नाही, असंही ते म्हणाले.
दोन्ही गोष्टीचा पैसा मुंबई पालिकेला द्यावा
या दोन्ही रस्त्यावर एमएसआरडीसी टोल का घेत आहे? हा पैसा कुणाला दिला जात आहे? मुंबईकर आधीच महापालिकेला कर भरतात. त्यात हा टोलचा पैसाही मुंबईकरांनी का द्यावा? मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी? देशात सर्वाधिक कर मुंबईकर देत असतो. मुंबईला पिळून काढलं आहे, असं सांगतानाच या दोन्ही रस्त्यावरील टोलनाका आणि होर्डिंगचा पैसाही पालिकेला मिळायला हवा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
महापालिका आयुक्तांना पत्र दिले
या संदर्भात मी काल महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यात या दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. मुंबईकर कर भरतोय हे मान्य असेल तर या दोन्ही मार्गांवरील टोलनाका बंद व्हावा. कंत्राटदार तुमचे मित्र असतीलही तरीही त्यांच्याशी वन टाईम सेटलमेंट करावे. त्यासाठी महापालिकेचा पैसा घेता कामा नये. या रस्त्यावर जे होर्डिंग्ज लागले आहेत. तो निधी पालिकेला दिला पाहिजे, असं सांगतानाच मी आव्हान देतो कंत्राटदार त्यांचे मित्र नसतील तर त्यांनी टोलनाके बंद करावेत, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.