अमरावती7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आचार्य पदवी (पीएचडी) संशोधन आराखडा सादर करण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. पूर्वी ही तारीख २२ सप्टेंबर होती. सदर मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) महानगर शाखेच्यावतीने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे यांना निवेदन सादर करण्यात आले होते. त्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला, असा संबंधित संघटनेचा दावा आहे.
विद्यापीठाने संशोधक विद्यार्थ्यांना त्यांचा संशोधन आराखडा सादर करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु याच काळात असलेल्या विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात संशोधक विद्यार्थ्यांनी आराखडा सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. तशी पत्रेही काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनासोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे दिली होती. त्याला अनुसरुन संघटनेच्या प्रदेश सहमंत्री आर्या पाचखेडे, महानगर संघटन मंत्री आदित्य बांते, आयुष पारीख, साक्षी कोंडोलीकर, गौरी भारती यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधीमंडळाने परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
दरम्यान संचालक मोनाली तोटे यांनी विद्यापीठाच्या इतर संबंधित अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करुन मुदतवाढ देण्याचा विद्यार्थीहिताचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचा संशोधन आराखडा आता ३० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाकडे सादर करता येणार आहे. या निर्णयाबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमरावती महानगर शाखेच्यावतीने विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहे. आचार्य पदवीकरिता शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये प्रवेशित एम.फिल.धारक व सन २०२३ ची कोर्सवर्क परीक्षा उत्तीर्ण झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून आठवडाभराची मुदत मिळाल्यामुळे त्यांना आपला संशोधन आराखडा व्यवस्थितरित्या मांडता येणार आहे.