विटा; महातंत्र वृत्तसेवा : आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणतात, या पेक्षा देवेंद्र फडणवीस काय म्हणतात याला महत्त्व आहे. आमदार अनिलराव बाबर हेच २०२४ ला महायुतीचे उमेदवार असतील अशी माहिती मंत्री ना. उदय सामंत यांनी आज (दि. ३१) मुंबईत दिली.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी (दि. ३०) सांगली जिल्ह्यातील तामखडी (ता.खानापूर) येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात २०२४ च्या खानापूर विधानसभेची निवडणूक एक लाख टक्के आपण लढविणार आहोत आणि जिंकणार आहोत. त्याच्यासाठी काहीही करायला लागले तरी आपली तयारी आहे, असे म्हटले होते. त्यानंतर मात्र राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या भाजप आणि शिंदे गट यांच्या स्थानिक कार्य कर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते. काही पत्रकारांनी याबाबत थेट शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, अनिल बाबर हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणतात यापेक्षा देवेंद्र फडणवीस काय म्हणतात हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. खानापूर मतदार संघातून अनिल बाबर हेच आमचे नेतृत्व करतील आणि फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असेही मंत्री सामंत यांनी यावेळी म्हटले आहे.