छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर, पोलिसांवर जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत | महातंत्र
छत्रपती संभाजीनगर, महातंत्र वृत्तसेवा : एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांना काही लोक मारहाण करीत असल्याचा कॉल आल्यावर सिडको ठाण्यातील डायल ११२ वरील दोन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्या आरोपींनी पोलिसांवरही हल्ला चढविला. तिघांनी पोलिसांनाही अक्षरश: बेल्ट व हाताचापटाने बेदम मारहाण केली. शनिवारी (दि.७) सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. शिवानंद गजानन मोरे (वय ३५), गजानन मोरे (६५) आणि विजया गजानन मोरे (५५, तिघेही रा. टी.व्ही. सेंटर, हडको), अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिकची माहिती अशी की, पोलीस अंमलदार उत्तम जाधव आणि अतुल सोळंके हे दोघे शनिवारी सिडको ठाण्यातील डायल ११२ गाडीवर ड्यूटी करत होते. सायंकाळी साडेसहा वाजता एम्स हॉस्पिटलमध्ये काही लोक राडा करीत असून त्यांनी डॉक्टरांनाही मारहाण केली आहे, असा कॉल डायल ११२ वर आला. त्या माहितीनुसार, अंमलदार जाधव व सोळंके पावणेसात वाजता घटनास्थळी पोहचले. तेव्हा आरोपींची गाडी (एमएच २० जीई २५१९) रस्त्यावर आडवी उभी होती. पोलिस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील गाडी बाजुला घेण्यास सांगितले. तेव्हा बेल्ट हातात घेऊन हॉस्पिटलमध्ये उभा असलेला आरोपी शिवानंद मोरे मी गाडी बाजूला घेणार नाही, तसेच, हॉस्पिटल जाळून टाकणार, असे मोठमोठ्याने ओरडू लागला.

दोन्ही पोलिसांनी त्याला गाडी बाजुला घे, नसता कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे बजावताच त्याने डॉक्टरांकडील मोर्चा पोलिसांकडे वळविला. पोलिसांनाच शिवीगाळ सुरू केली. तसेच उत्तम जाधव यांच्या वर्दीची कॉलर पकडून बेल्टने मारहाण सुरू केली. हा प्रकार पुढे वाढत गेला. त्याचे आई-वडील गजानन व विजया या दोघांनीही जाधव यांना पकडले आणि मारहाण केली.  हा प्रकार वाढल्यानंतर नागरिकांनी मध्यस्थी करून पोलिसांची सुटका केली.

हेही वाचलंत का?

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *