‘इंडिया’ला घाबरलेल्या मोदींनी 38 पक्षांची बैठक घेतली: पृथ्वीराज चव्हाण यांची भाजपवर सडकून टीका

मुंबई10 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपकडून सातत्याने टीका होत आहे. मात्र, प्रत्यक्षात भाजप या आघाडीला घाबरली आहे, असे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपकडून इंडिया आघाडीवर होत असलेली टीका हास्यास्पद आहे,असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. देशभरातील 28 पक्ष मोदी सरकार विरोधात एकत्र आले आहेत.

या आघाडीला घाबरून बंगलुरुमध्ये इंडिया आघाडीची दुसरी बैठक होत असतानाच नरेंद्र मोदी यांनी घाईघाईने एनडीएची बैठक बोलावली होती. इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी व भाजपा घाबरलेले आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. दादर येथील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात राहुल गांधी यांच्या सत्काराच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात 62 टक्के लोकांनी मतदान केले होते. यावेळी मतांचे विभाजन होऊ द्यायचे नाही, असे विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. इंडिया आघाडी भक्कमपणे उभी आहे म्हणून भाजपाकडून मतविभाजन व्हावे यासाठी बीआरएससारख्या पक्षांना पुढे केले जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, निधी वाटपावरूनही सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरु आहेत. सरकारधील वादाचा फटका शेतकरी, तरुण, कामगार, व राज्यातील गुंतवणूकीवर होत आहे. महाराष्ट्रात अस्थिर राजकीय परिस्थिती असल्याने कोणताही मोठा गुंतवणुकदार येत नाही. वेदांता फॉक्सनसारखा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला.

आताही अॅपल कंपनीने 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तामिळनाडू, कर्नाटक राज्यात केली आहे. यामुळे राज्यातील तरुण रोजगारांपासून वंचित राहत आहेत. कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जपान, चीन मध्ये कांदा 200-500 रुपये किलो आहे, कांदा निर्यात केला तर शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतील म्हणून केंद्र सरकारने तात्काळ निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशातील हुकूमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती म्हणूनच मुंबईत 1 सप्टेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीने जननायक राहुल गांधी यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे, असे यांनी सांगितले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *