डबल डेकर’ ग्रीन बस ज्‍येष्‍ठांच्‍या सेवेत, गडकरी यांनीही केला प्रवास | महातंत्र

नागपूर, महातंत्र वृत्‍तसेवा :  अशोक ले-लँड आणि ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिष्‍ठान यांच्‍या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी  ‘डबल डेकर’ इलेक्ट्रीक बसचा (ग्रीन बस) लोकार्पण सोहळा केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, त्यांच्याच वर्धा रोडवरील निवासस्थानी पार पडला. या माध्यमातून उपेक्षित अशा ज्येष्ठांच्या जीवनात आनंद पेरण्याचा आपला प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. सध्या शेगाव असले तरी पुढे शिर्डीपर्यंत बस नेण्याचा प्रयत्न असल्याचे जाहीर केले.

ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या बसमधून प्रवासाचा आनंदही इतर अतिथींसह घेतला.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिष्‍ठानचे कार्याध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ नेते दत्‍ता मेघे यांच्यासह यावेळी   स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू, अशोक ले-लँड लिमिटेडचे उपाध्‍यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स) यश सच्चर, पश्चिम व मध्‍य झोनचे प्रमुख . ए. के. सिन्‍हा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार  कृष्णा खोपडे,  प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, माजी खासदार डॉ.  विकास महात्मे, अजय संचेती, माजी आमदार डॉ.  गिरीश गांधी, प्रा. अनिल सोले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. अशोक ले-लँडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानला ही बस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिष्‍ठानच्‍यावतीने ज्‍येष्‍ठ नागरिकांच्या नि:शुल्‍क धार्मिक स्थळ तसेच पर्यटनस्थळांच्या सहलीसाठी या डबल डेकर ग्रीन बसचा उपयोग केला जाणार आहे. सद्यस्थितीत प्रतिष्‍ठानकडे ऑलेक्‍ट्रा कंपनीची एक ग्रीन बस असून ही बस गेल्या पाच वर्षांपासून ज्येष्‍ठ नागरिकांच्‍या सेवेत आहे. या ग्रीन बसद्वारे शेगाव, माहूर, कळंब, आंभोरा, आदासा, धापेवाडा आदी धार्मिक स्थळांच्या निःशुल्क सहलीचा हजारो ज्‍येष्‍ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे.

नितीन गडकरी यांच्‍या प्रयत्‍नांतून या दोन्‍ही बसेस ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिष्‍ठानला मिळाल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा यांनी दिली. अशोक ले-लँड कंपनीची ही डबल डेकर ग्रीन बस वातानुकुलित असून यात ६५ प्रवाशांची बसण्‍याची व्‍यवस्‍था आहे.दीड ते तीन तासाच्‍या एका चार्जिंगमध्‍ये २५० किमी धावू शकते हे विशेष.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *