नाशिक : महातंत्र वृत्तसेवा
चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघी नाशिक नगरी सज्ज झाली आहे. गणरायाच्या आगमन सोहळ्यासाठी भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला (दि.१८) पूजा साहित्य व गणेश आराससाठी साहित्य खरेदीसाठी बाजारात लगबग पाहायला मिळाली. यावेळी काही भक्त वाजत-गाजत सोमवारीच गणेशमूर्ती घरी घेऊन गेले. (Ganesh Chaturthi 2023)
संबधित बातम्या :
यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थी आणि अंगारक योग असा एकत्रित दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. त्यामुळे भक्तांमध्ये उत्साह आहे. दहा दिवस चालणाऱ्या उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र चैतन्य पसरले आहे. श्री गणेशाच्या आगमनासाठी विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. गणेश पूजनासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नाशिककरांनी सोमवारी (दि.१८) बाजारपेठेत गर्दी केली. शहराचा मुख्य भाग असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड, सराफ बाजार, अशोकस्तंभ, रेडक्रॉस आदी परिसर नागरिकांनी अक्षरश: गजबुजून गेला. गणेशाला प्रिय असलेल्या दूर्वा, जास्वंदीची फुले, आसन, प्राणप्रतिष्ठेसाठी पाट व अन्य पूजासाहित्य घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. तसेच नागरिकांनी गणेश मूर्तीभोवती आरास करण्यासाठी विविध वस्तूंची मनमुराद खरेदी केली. यावेळी आबालवृद्धांसह बच्चेकंपनीचा आनंद गगनात मावेनासा झाला. दरम्यान, शहराच्या मुख्य परिसरासह पंचवटी, इंदिरानगर, नाशिकरोड, सातपूर, सिडको आदी ठिकाणीही खरेदीसाठीची धूम पाहायला मिळाली.
घरगुती गणपतीप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून दिवसभर देखाव्यांवर अखेरचा हात फिरवण्यात आला. त्या नंतर सायंकाळी माेठ्या गणेशमूर्तींचा वाजत-गाजत मंडपांमध्ये आगमन साेहळा रंगला. एकूणच गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुढील दहा दिवस वातावरण उत्साही असणार आहे.
फूलबाजार सजला
गेल्या काही दिवसांपासून कोमजलेल्या फूलबाजाराला गणेशाेत्सवामुळे उभारी मिळाली आहे. चालू वर्षी उशिराने पावसाचे आगमन झाले असल्याने फुलांच्या उत्पादनात काहीशी घट झाली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असणार आहे. त्यामुळे जास्वंद, दूर्वा, कमळाचे फूल, केवड्याच्या पानासह अन्य फुलांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
विक्रेत्यांना बाप्पा पावला
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी मुख्य परिसरात रस्त्याच्या दुतर्फा आसन, पूजा साहित्य तसेच विविध सजावटीच्या वस्तूंची विक्रीची दुकाने थाटली. गणेशभक्तांनी या विक्रेत्यांकडून मनाप्रमाणे खरेदी केली. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याने विक्रेत्यांना बाप्पा पावला.
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा मुहूर्त
भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला (दि.१९) यंदा भद्रा व वैधृति योग असला तरी नेहमी प्रमाणे ब्रह्म मुहूर्तापासून म्हणजेच पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५० मिनिटांपर्यंत घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.
हेही वाचा :