Ganeshotsav 2023 : मंगलमय गणेशोत्सवास आजपासून प्रारंभ; कधीपर्यंत करता येईल प्राणप्रतिष्ठापना? | महातंत्र

पुणे; महातंत्र वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या रांगड्या मराठमोळ्या संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणून गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे विघ्नहर्त्या गणरायाच्या उत्सवाची प्रतीक्षा आबालवृद्धांना वर्षभर लागून असते. यंदाच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा संपली असून, मंगलमय सोहळ्यास मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. लाडक्या गणरायाचे आगमन गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर होणार असून, या मंगलमय सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे.

संबंधित बातम्या :

चैतन्य घेऊन येतोय बाप्पा..!

ढोल-ताशाच्या निनादात…गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात…आनंदी वातावरणात मांगल्याचे प्रतीक असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाचे आज मंगळवारी (दि. 19) आगमन होणार आहे. सार्‍या पुणेकरांचा आनंद बाप्पाच्या आगमानाने द्विगुणित होणार आहे. हा देदीप्यमान उत्सव चैतन्य घेऊन आल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांसह सर्वांमध्ये हर्षोल्हासाची लहर आहे. नगारा आणि सनईच्या सुरावटीत आणि बँड पथकांच्या सुरेल वादनाने मानाच्या पाच आणि प्रमुख गणपती मंडळांच्या बाप्पाच्या मिरवणुका निघणार आहेत. सारे कार्यकर्तेही बाप्पाच्या स्वागतासाठी भारावलेले आहेत. घरगुती गणपतीचे स्वागत वाजतगाजत होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी
संपूर्ण शहर उत्साहात न्हाऊन गेले आहे.

बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी झाली असून, मंगळवारी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरात सर्वदूर सळसळता उत्साह आणि चैतन्याची पालवी पाहायला मिळाली. मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग, देखाव्यांचे अंतिम टप्प्यातील काम, मिरवणुकीची तयारी, पूजेसाठीच्या साहित्यांची जुळवाजुळव आणि कार्यक्रमाचे नियोजन करणारे कार्यकर्ते पाहायला मिळाले. बाजारपेठांमध्ये बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने खरेदीचा आनंद पाहायला मिळाला.

पावसाच्या सरीत श्रीगणेशमूर्तीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेले पुणेकर आणि सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी दालनांमध्ये झालेली गर्दी असे चैतन्यपूर्ण वातावरण बाजारापेठांमध्ये रंगले होते. स्टॅालवरून श्रीगणेशमूर्ती घरी देताना ’गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करणारे लहानगे वडिलांसोबत पाहायला मिळाले. याशिवाय बाप्पाचे आगमन होणार असल्याने घरोघरीही जय्यत तयारी करण्यात आली. सजावटीच्या कामासह पूजेच्या साहित्यांची जुळवाजुळव करताना महिलावर्ग पाहायला मिळाला. तर सोसायट्यांमध्ये गणेशोत्सवासाठीची जोरदार पाहायला मिळाली.

पारंपरिक वेशभूषा… ढोल-ताशा वादन…

बाप्पाचे आगमन पारंपरिक पद्धतीने होणार आहे. पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, ढोल-ताशा पथकांचे वादन असा सोहळा म्हणजे पुण्यातील मिरवणुकीची देदीप्यमान परंपरा…मिरवणुकीचा तो रंग, तो आनंद यंदाही पाहायला मिळणार आहे. मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांसह शहर आणि उपनगरातील इतर मंडळांच्या मिरवणुकाही वाजतगाजत निघणार आहेत. मिरवणुकीनंतर विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. मंडळांचा प्रत्येक कार्यकर्ता बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. तर घराघरांमध्ये आनंदी वातावरणात बाप्पाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे. पारंपरिक वेशभूषेत सहकुटुंब बाप्पाचे स्वागत केले जाणार आहे.

दुपारपर्यंत करता येईल प्राणप्रतिष्ठापना

यंदा भद्रा आणि वैधृती योग असला, तरीही नेहमीप्रमाणे ब—ाह्म मुहुर्तापासून म्हणजेच पहाटे 4 वाजून 50 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 50 मिनिटांपर्यंत कधीही आपल्या घरात श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करता येईल, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. श्रीगणेश चतुर्थी या दिवशी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी प्रतिष्ठापना करणे जमले नाही, तर पुढे कोणत्याही दिवशी प्रतिष्ठापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुढील वर्षी गणपती पूजन करता येते, असेही दाते यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

अजित पवार यांना उपमुख्यमंत्री मानत नाही : आमदार पडळकर

Ajit Pawar/Sharad pawar : अजित पवारांना शह देण्यासाठी मोठ्या पवारांची फळी सज्ज; २ माजी आमदारांचे गट सरसावले

सुरत-चेन्नई महामार्ग : पाचपट मोबदल्यासाठी शेतकरी रस्त्यावर

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *