पणजी; महातंत्र वृत्तसेवा : नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी आज (दि. १९) मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. तसेच मंत्रीमंडळातील इतर मंत्री व खासदार श्रीपाद नाईक उपस्थित होते. शपथविधीनंतर राज्यपाल श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. या आमदारांपैकी दिगंबर कामत आणि आलेक्स सिक्वेरा यांचे नाव मंत्रीपदासाठी नेहमी आघाडीवर होते. अखेर त्यातील आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद मिळाले आहे.
आलेक्स सिक्वेरांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार है कळल्यावर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सिक्वेरांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांनी मंत्रिपद जरा उशिरानेच मिळाले,तरीही आपण खूश आहे अशी प्रतिक्रिया दिली.त्यांच्या मंत्रीपदाबद्दल बोलताना ते म्हणाले, मी सध्याच्या राजकीय निर्णयावर खुश आहे. माझ्याबद्दलचा निर्णय योग्यवेळी पक्षातर्फे घेतला जाईल.
दरम्यान,आलेक्स सिक्वेरा यांना तुम्हाला कुठले खाते मिळेल असे विचारले असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देतील ते असे सांगून मी मुख्यमंत्री असतो तर हवे ते खाते घेतले असते. आता जे खाते मिळेल त्याचा उपयोग गोव्याचा विकासासाठी करेन असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप चे सदानंद शेठ तानवडे, मुख्यमंत्री सावंत आणि मतदारांचे आभार मानले.मतदारांनी जर निवडून दिले नसते तर मी आमदार झालो नसतो आणि हा दिवस मला अनुभवता आला नसता असे सांगितले.त्यांना भेटण्यासाठी नुवेसह अन्य गावांतून महिला, पुरुष, मुले मोठ्या संख्येने राजभवनवर उपस्थित होते.त्यांनी मंत्री सिक्वेरा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तर राजभवन परिसरात मंत्री सिक्वेरा यांना शुभेच्छा देण्यासाठी थांबलेल्या मतदारांची आणि छोट्या मुलांची त्यांच्या जागेवर जात भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारल्या.
हेही वाचा