नागपूर8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये, शिक्षकांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांकडून केले जाते. आमची महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये देखील शिक्षकांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांकडून सुरू केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. शिक्षकदिनानिमित्त रातुम नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित शताब्दी महोत्सव पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
सिव्हिल लाईनमधील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, उपकुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
..तेव्हाच विद्यार्थी कुलपतींकडे जातो
विद्यापीठांच्या मानांकनाइतकेच शिक्षकांचे मानांकन महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालये आणि विद्यापीठांची चांगली निवड करण्यास मदत होईल असे बैस यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची आणि समस्यांची विनम्रपणे आणि निकडीने उत्तरे देण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घेतली पाहिजे. विद्यापीठ स्तरावर त्यांच्या तक्रारी सोडवल्या जात नाहीत तेव्हा विद्यार्थी कुलपतींकडे जातात अशी कानटोचणी बैस यांनी केली.
परीक्षाच्या निकालातील विलंब मान्य नाही
विविध परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास होणारा विलंब अजिबात मान्य होणारा नाही. विद्यापीठ आणि महाविद्यालयांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार नाही. सर्वोत्कृष्ट प्राध्यापकांच्या भरतीकडे विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी तातडीने लक्ष दिले पाहिजे. अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये 30 ते 40 टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आपली विद्यापीठे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आपण मार्ग आणि माध्यमे शोधली पाहिजेत असे बैस यांनी स्पष्ट केले.
आज आपण जागतिक कनेक्टिव्हिटीच्या युगात आहोत. विद्यापीठांनी शैक्षणिक कार्यक्रम आखण्यासाठी, काही सेमिस्टर पूर्ण करण्यासाठी, अभ्यासक्रमांची रचना करण्यासाठी, विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांची देवाणघेवाण करण्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालये आणि विद्यापीठांशी सहकार्य करार केले पाहिजे.
कृत्रिम बुद्धिमत्ता शिकणे गरजेचे
आमच्या पदवीधरांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख करून देण्याची वेळ आली आहे. त्यांना नवीन कौशल्ये शिकण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. अनेक विद्यापीठे जबाबदारीने कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याची तयारी करीत आहेत असे प्रतिपादन बैस यांनी केले. विद्यार्थ्यांना एआयचा नैतिक वापर शिकवणे आणि एआय तंत्रज्ञान सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे याची खात्री करणे देखील आवश्यक आहे.
वाचन, लेखन आणि अंकगणितासारखी महत्त्वाची कौशल्ये एआयने वेगाने मागे टाकली आहेत. एआयमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळतील, तर नोकऱ्यांचे नुकसानही होईल. यासाठी नवीन कौशल्ये शिकणे आवश्यक आहे. मॅकिन्से आणि कंपनीच्या अहवालानुसार, 2030 पर्यंत ऑटोमेशनमुळे 400 ते 800 दशलक्ष नोकऱ्या संपतील. तर 37.5 कोटी लोकांना पूर्णपणे नवीन क्षेत्रात काम करावे लागेल हे लक्षात घेता विद्यापीठांनीही एआय आत्मसात करणे गरजेचे आहे.