राहुरी येथील कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आश्वासन: के. के. रेंजसाठी जिल्ह्यातील एक गुंठा जमीन जाऊ देणार नाही

अहमदनगर6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

के. के. रेंजसाठी नगर जिल्ह्यातील एक गुंठा जमीन जावू दिली जाणार नाही. के. के. रेंजसाठी अन्य ठिकाणी जागा शोधावी, हा पर्याय भारत सरकारला दिला असून देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह लोणीला येणार असल्याने या प्रश्नाबाबत साकडे घातले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत राहुरीसाठी मंजूर झालेल्या १३६ कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटारीच्या पहिल्या टप्प्यातील ९२ कोटी ९८ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, ज्येष्ठ नेते अड. सुभाष पाटील, रावसाहेब चाचा तनपुरे आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना व भाजप या डबल इंजिन सरकारला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे इंजिन जोडले गेल्याने विकासकामांना गती येणार आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र ठरले. या योजनेचा तालुक्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला. केंद्र सरकारच्या विकासाच्या योजनातून सामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन करण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले, एक वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे व फडणवीस सरकारने राहुरी शहराला १३४ कोटींची भुयारी गटार योजना मंजूर करून पहिल्या टप्प्यातील कामाचे आज भूमिपूजन देखील झाले. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासने पूर्ण करता आली नसल्याने स्वत: कर्तृत्वशुन्य असलेल्या राहुरीच्या लोकप्रतिनिधींकडून दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत आहे. सत्तेत आल्यानंतर मंत्री झाले. मात्र ग्रामीण रुग्णालय इमारत, बसस्थानक इमारत, मुळा धरण ते वावरथ थांबा पूल हे प्रश्न सोडवता आले नाहीत. मर्जीतील ठेकेदार नेमून पैसा मिळवण्याचे काम राहुरीत झाले. नगर जिल्ह्यातील २२ हजार एकर क्षेत्रावर के. के. रेंजची टांगती तलवार आहे. मात्र एक गुंठा जमीन जावू दिली जाणार नाही. यावेळी ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील, रावसाहेब चाचा तनपुरे यांची भाषणे झाली.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *