अहमदनगर : टँकर मंजुरीत हलगर्जीपणा नको; पालकमंत्री विखे यांचा अधिकार्‍यांना इशारा | महातंत्र

अहमदनगर; महातंत्र वृत्तसेवा : आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. परिणामी टंचाईग्रस्त गावांतून टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल होतील. बीडीओकडून प्रस्ताव दाखल झाल्यास पाच दिवसांत मंजूर करा. याबाबत हलगर्जीपणा दिसून आल्यास प्रांताधिकारी, तहसीलदार, बीडीओ यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. अकोले तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी 40 टक्के झाल्याचे दिसून येत आहे. अकोले तालुका वगळून पावसाची टक्केवारी तयार करा, असे निर्देशदेखील विखे यांनी दिले.

विखे पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेतली. या वेळी आमदार बबनराव पाचपुते, राम शिंदे, लहू कानडे, आशुतोष काळे व डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, झेडपीचे सीईओ आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जिल्हाभरातील पाऊस, धरणांतील पाणीसाठे, उपलब्ध चारा, टंचाईग्रस्त गावे आणि टँकर याबाबत माहिती दिली. कर्जत, जामखेड तालुक्यांतून टँकरसाठी प्रस्ताव दाखल होऊही ते मंजूर का होत नाहीत, टँकर मंजूर करू नका, असे कोणी सांगितले का, असा प्रश्न उपस्थित करून आमदार शिंदे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना धारेवर धरले. कर्डिले यांनी शिंदे यांना साथ दिली. त्यावर या दोन्ही तालुक्यांतील महसूल अधिकारी, तसेच बीडीओंना आरोपींच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले.

आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरूच झाला पाहिजे. टँकर मंजुरीबाबत कारवाईची वेळ आणू नका, असा इशारा विखे पाटील यांनी या वेळी दिला. जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे पिण्यासाठी व सिंचनासाठी असे काटेकोर नियोजन करावे. पाण्याचा अपव्यय होणार नाही यादृष्टीने काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. धरणांतील पाण्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊन पाणीवाटपावर लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पर्जन्यमापक यंत्रासाठी जागा उपलब्ध करा

महसूल मंडलाच्या कोणत्या तरी गावांत पाऊस होतो. बाकीच्या गावांत पावसाची नोंदही होत नाही. त्यामुळे प्रत्येक गावांत पर्जन्यमापक यंत्रे बसवावीत, अशी मागणी आमदार लहू कानडे यांच्यासह अनेकांनी केली. त्यामुळे प्रत्येक गावात एक गुंठा जागा पर्जन्यपक यंत्रासाठी उपलब्ध करा, असे निर्देश विखे यांनी तहसीलदारांना दिले.

मुख्यालयी राहता की पुण्याहून येता

जामखेड, कर्जत तालुक्यांत फोटो छापलेले खासगी टँकर सुरू आहेत का, असा सवाल पालकमंत्री विखेे पाटील यांनी तहसीलदार व बीडीओंना विचारला. याबाबत आपणास काही माहिती नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. तुम्ही मख्यालयी राहता की पुण्याहून येता, असा सवाल विखे यांनी करीत अधिकार्‍यांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. फोटो लावून पाणीवाटप करणारे खासगी टँकर जेथे धावत असतील, तेथे सरकारी टँकर सुरू करण्याचे आदेश त्यांनी अधिकार्‍यांना दिले.

…तर शेतकर्‍यांवर कारवाई करा

चारा उत्पादन करण्यासाठी 10 हजार 89 शेतकर्‍यांचे अर्ज आल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले. या शेतकर्‍यांकडे पाणी, लागवडीसाठी क्षेत्र आहे का, याची पाहणी करा; मगच बियाणे वाटप करून त्यांच्याशी करार करा. फक्त अनुदानासाठी अर्ज येणार नाहीत, याची दक्षता घ्या. जे शेतकरी करार पाळणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा, असेदेखील त्यांनी अधिकार्‍यांना स्पष्ट केले. यंदा चारा छावण्या सुरू करणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शेतकर्‍यांकडून चारा खरेदीसाठीचे दर येत्या काही दिवसांत जाहीर करणार आहे.

हेही वाचा

नाशिक : नागाच्या दंशाने मुलीचा मृत्यू, चांदवड परिसरातील घटना

उत्तर प्रदेशातील जमिनीच्या वादातून गोव्यात खून, ४ जणांना अटक

Indonesia Earthquake : इंडोनेशियाच्या बाली सागरी प्रदेशात आज ७.० तीव्रतेचा भूकंप

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *