हर हर महादेव’चा जयघोष, हजारोंचा कावड यात्रेत जल्लोष | महातंत्र








हिंगोली, महातंत्र वृत्तसेवा : कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हर हर महादेवच्या गजरात आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी निघालेल्या कावड यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. या भाविकांसाठी दानशूरांनी तब्बल 30 क्विंटल साबुदाणा खिचडी, 50 हजार पाणी बॉटल्स, केळी, सफरचंदाचे वाटप करण्यात आले.

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा काढली जाते. मागील पाच ते सहा वर्षापासून कावड यात्रा काढली जात असून कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत यात्रा काढली जाते. त्यानुसार आज या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मागील तीन महिन्यापासून त्याचे नियोजन करण्यात आले होते.

कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून आज दुपारी बारा वाजता आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा काढण्यात आली. चिंचाळेश्वर महादेव मंदिरात कालीपुत्र कालीचरण महाराज, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख (शिंदेगट) आनंदराव जाधव, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, वसमत तालुका प्रमुख राजू चापके, धनंजय पाटील यांच्या हस्ते पुजा केल्यानंतर कावड यात्रेला सुरुवात झाली. या कावड यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. कळमनुरी ते हिंगोली सुमारे 20 किलोमीटर अंतरापर्यंत पायी चालत असलेल्या कावड यात्रेकरुंसाठी दानशूरांनी ठिकठिकाणी शीतपेय, पिण्याची पाणी, खिचडी, केळी, सफरचंद ठेवला होता. बम बम बोले, हर हर महादेवच्या गजरात कावड यात्रा हिंगोलीत पोहोचली.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *