अमरावती7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
एक दिवसाआधीच्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील १८ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याने या भूभागात मोठ्या प्रमाणात पिक नुकसानीची शक्यता असून त्यासाठीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे.
सध्या शेतांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, मका अशी पिके आहेत. या पिकांना पाण्याची गरज होतीच. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस अचानक दिवसभर सुरु राहिल्याने अनेक खोलगट भागात जमीनीवर पाणी साचले. त्यामुळे काही भागात कापसाच्या फुल-पात्या गळल्या असून सोयाबीन आणि तुरीच्या शेंगांनाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार कृषी, महसूल व ग्रामविकास विभाग पंचनामे करण्यात व्यग्र झाला आहे.
महसूल प्रशासनाच्या नोंदीनुसार धारणी तालुक्यातील धारणी व हरिसाल, चिखलदरा तालुक्यातील चिखलदरा, चुर्णी, टेंब्रुसोंडा व सेमाडोह, मोर्शी तालुक्यातील मोर्शी, शिरखेड व अंबाडा, वरुड तालुक्यातील वरुड, शेंदुरजनाघाट व पुसला, अचलपुर तालुक्यातील अचलपुर व परतवाडा आणि चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव, तळेगाव मोहना, शिरजगाव बंड व ब्राम्हणवाडा थडी महसूल मंडळात 24 तासांच्या आत 65 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद केली गेली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी संकटात अडकले असून शासकीय मदतीची प्रतीक्षा करीत आहेत.