हिंगोली; महातंत्र वृत्तसेवा : आंतरजातीय विवाहाचे ५० हजार रुपयांचे अनुदान बँक खात्यात टाकण्यासाठी आठ हजार रुपयाची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. २८) दुपारी रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराने आंतरजातीय विवाह केला होता. आंतरजातीय विवाहाचे शासनाचे असलेले ५०,००० रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी त्यांनी समाज कल्याण विभागाकडे रितसर प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार समाज कल्याण विभागाने प्रस्ताव मंजूर देखील केला. मात्र, सदरील अनुदानाची रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात टाकण्यासाठी कनिष्ठ लिपिक बिभिषण विष्णुपंत पांचाळ यांनी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनंतर आज (दि. २८) उपाधीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनूस, विजय शुक्ला, जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे, तान्हाजी मुंडे, भगवान मंडलिक, शेख अकबर, गजानन पवार, गोविंद शिंदे, राजाराम फुफाटे, शिवाजी वाघ यांच्या पथकाने जिल्हा परिषद परिसरात सापळा रचला होता. यावेळी तक्रारदाराकडून आठ हजार रुपयाची लाच घेताना पांचाळ याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.