श्रद्धांजली: आचरणातील शुद्धता, वैचारिक स्पष्टता आणि एकनिष्ठता ही स्व. मदनदासजी यांच्या जीवनाची त्रिसुत्री : भैयाजी जोशी

पुणे3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आचरणातील शुद्धता, वैचारिक स्पष्टता आणि एकनिष्ठता ही स्व. मदनदासजी देवी यांच्या जीवनाची त्रिसूत्री होती. ‘स्व’ विसरणे सोपे नसते; पण मदनदासजींनी संघटनेसाठी जीवन समर्पित केले. राष्ट्र, समाज आणि देशसेवेत किती टोकापर्यंत जायला हवे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे जीवन होते, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी मदनदासजी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

रा. स्व. संघ पुणे महानगर आणि बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व सहसरकार्यवाह आणि अभाविपचे पूर्व राष्ट्रीय संघटन मंत्री स्व. मदनदासजी देवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये करण्यात आले होते. यावेळी भैयाजी जोशी बोलत होते.

मदनदासजी शरीराने नसले, तरी त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांच्या रूपाने आपल्यातच आहेत. त्यांची कार्यशैली आत्मसात करून त्यांचे कार्य पुढे जात राहील, असे जोशी म्हणाले. संघटनेसाठी जे तत्त्वज्ञान मांडले गेले ते मूर्तरूपात आणण्याचे फार मोठे काम त्यांनी केले. कार्यकर्त्यांची जडणघडण त्यांनी ज्या पद्धतीने केली ते पाहता असे म्हणता येईल की, त्या कार्यकर्ता जडणघडणीचे जे मुक्त विश्व विद्यालय आहे, त्यातील सर्व विभागांचे ते प्रमुख होते. मदनदासजी अत्यंत अर्थपूर्ण जीवन जगले असेही त्यांनी सांगितले.संघटनेचे कार्य करताना किंवा समाजजीवनातही काय नसले पाहिजे, हे सांगणारे खूप लोक असतात; परंतु मदनदासजी नेहमीच काय असले पाहिजे याची मांडणी करत असत. देश, समाजाची स्थिती आणि संघटनेच्या कार्याची स्थिती याची ते नेहमीच समीक्षात्मक चर्चा करत, असेही भैयाजी म्हणाले. व्यक्तीची पारख करण्याची अद्भूत क्षमता त्यांच्या अंगी होती. प्रत्येकाची क्षमता ओळखून त्या व्यक्तीचा उपयोग ते कार्यासाठी करून घेत आणि ही क्षमता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये संक्रमित केली, असेही ते म्हणाले.

विद्यार्थी परिषदेचे अभ्यासवर्ग आणि अधिवेशने यांचा समारोप संघटनमंत्री या नात्याने मदनदासजी करत असत त्यावेळी त्यांचे जे भाषण असायचे, ते शब्द हृदयात कोरून ठेवावेत असे असत, असे मनोगत बी.एम.सी.सी. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जी व्यक्ती आपल्या संपर्कात येईल ती आपल्यापेक्षा आपल्या विचाराशी जोडली गेली पाहिजे, या भावनेतून मदनदासजी कार्य करत. प्रत्येकात काही ना काही गुण आहेत ते सर्व एकत्र करून संघटनेचे काम करायचे, हे त्यांच्या व्यवहारातून शिकायला मिळाले. त्यांच्या एकेका वाक्यातून जीवन व्यवहार कसा करायचा, हे समजत असे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *