बेळगाव : महातंत्र वृत्तसेवा : राज्य सरकारने राज्यातील सर्वच एलसीव्ही (लाईट कमर्शियल व्हेईकल) धारकांना आगामी पंधरा वर्षाचा टॅक्स आताच भरा तरच वाहनांचे पासिंग होईल, असा तगादा आरटीओ विभागाने लावला आहे. काही दिवसापुर्वी राज्याचे परिवहन व वाहतूक मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी याबाबतची घोषणा करून राज्यातील सर्वच एलसीव्हीधारकांना बुचकाळ्यात टाकले आहे. याची अंमलबजावणी सुरु झाल्याने जिल्ह्यासह राज्यातील लाखो वाहनधारकांसमोर सुमारे 1 ते 2 लाख रु. टॅक्स भरायचा कसा, या आर्थिक समस्येने हैराण झाले आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथीलही हजारो एलसीव्ही धारकांमधून नाराजीचा सूर आहे. सध्या तीन महिन्याचा टॅक्स भरून घेण्याचे आरटीओ कार्यालयाकडून थांबवण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील हजारो वाहनांचे पासिंग रखडले आहे.
याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे त्यांचे लक्ष लागून आहे. बंगळूर येथे 11 सप्टेंबर पासून एलसीव्ही धारकांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बेळगावात ही उद्या आंदोलन करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यात सुमारे दहा हजार एलसीव्ही वाहनधारक आहेत. सध्या पाच ते सात टन इतका माल वाहतूक करणार्या वाहनांचा तसशच पिवळ्या क्रमांक असणार्या प्रवासी वाहनांचा एलसीव्ही या प्रकारात समावेश आहे. यात
साधारण 3 महिन्याला 2 हजार रुपये इतका टॅक्स भरणार्या वाहनचालकाला आता आगामी 15 वर्षासाठी 1 लाख रुपयांहून अधिक टॅक्स आताच भरा, असे आरटीओ विभागातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे इतके पैसे भरायची आता क्षमता नाही. तर अशा स्थितीत जर व्यवसाय सुरु केला तर अधिकार्यांकडून मोठा दंड आकारला जात आहे, यामुळे वाहनधारकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.